दक्षिण मुंबईमध्ये आवाज पुरुषांचाच; आजवर एकच महिला विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 09:32 AM2024-03-20T09:32:07+5:302024-03-20T09:35:10+5:30
मतदानाचे प्रमाण ५०-६० टक्क्यांच्या घरात.
संतोष आंधळे, मुंबई : देशातील श्रीमंत मतदारसंघ म्हणून मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. आजवर लोकसभेच्या १७ निवडणुकांत भारतीय जनता पक्षाच्या दिवंगत जयवंतीबेन मेहता या एकमेव महिला खासदाराने दोनदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर उर्वरित निवडणुकांत या मतदारसंघाचे नेतृत्व पुरुष खासदारांकडेच होते. यंदाच्या निवडणुकीत सुद्धा या मतदारसंघातील लढत पुरुष उमेदवारांमध्ये होण्याची शक्यता आहे.
१९९६ व १९९९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपच्या तिकिटावर मेहता या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. या मतदारसंघात अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक लढवली आहे. त्यावेळी बहुतांश पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात पुरुष उमेदवार उतरविले होते. मात्र, २००९ च्या निवडणुकीत दिवंगत बँकर मीरा सन्याल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.
आजवर निवडून आलेले खासदार -
वर्ष खासदार पक्ष
१९५२ स. का. पाटील काँग्रेस
१९५७ स. का. पाटील काँग्रेस
११६२ स. का. पाटील काँग्रेस
१९६७ जॉर्ज फर्नांडिस संयुक्त सो. पार्टी
१९७१ कैलास शिवनरेन काँग्रेस
१९७७ रत्नसिंग राजदा जनता पार्टी
१९८० रत्नसिंग राजदा जनता पार्टी
१९८४ मुरली देवरा काँग्रेस
१९८९ मुरली देवरा काँग्रेस
१९९१ मुरली देवरा काँग्रेस
१९९६ जयवंतीबेन मेहता भाजप
१९९८ मुरली देवरा काँग्रेस
१९९९ जयवंतीबेन मेहता भाजप
२००४ मिलिंद देवरा काँग्रेस
२००९ मिलिंद देवरा काँग्रेस
२०१४ अरविंद सावंत शिवसेना
२०१९ अरविंद सावंत शिवसेना
काँग्रेस १० वेळा विजयी -
या मतदारसंघात काँग्रेसच्या देवरा कुटुंबीयांचा वरचष्मा राहिला आहे. लोकसभेच्या सहा निवडणुकांत नागरिकांनी देवरा कुटुंबातील सदस्याला खासदार म्हणून संसदेत पाठविले आहे, तर अन्य चार वेळा काँग्रेसचा उमेदवार खासदार म्हणून येथून निवडून आला आहे.
श्रीमंत मतदारसंघ -
मुंबई दक्षिणमध्ये १९५१ पासून झालेल्या लोकसभा निवडणुकांतील एखादा अपवाद वगळा मतदानाचे सर्वसाधारण प्रमाण ५० ते ६० टक्क्यांच्या घरातच राहिले आहे.
या मतदारसंघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.
या मतदारसंघात देशातील श्रीमंत उद्योगपतींपासून ते श्रमिक सर्वस्तरांतील नागरिक राहतात. राज्याचे मुख्यमंत्री, अन्य मंत्री यांचे मलबार हिल परिसरातील शासकीय निवासस्थाने, वरळी येथे आमदारांची सोसायटी, तसेच राज्यातील आमदारांसाठी निवासाची सोय असलेला ‘आमदार निवास’ही या लोकसभा मतदारसंघात येतो.