मुंबई : आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या चिठ्ठीत अर्जदाराचे - अरमान खत्री - नाव आहे म्हणून त्यानेच मृत व्यक्तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशा निष्कर्षापर्यंत पोहचू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवित विशेष न्यायालयाने अरमान खत्रीची जामिनावर सुटका केली.
दर्शन सोळंकी याने १२ फेब्रुवारी रोजी पवईतील आयआयटी कॅम्पसमधील वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तीन आठवड्यानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाला सोळंकीच्या रूममध्ये एका ओळीची चिठ्ठी सापडली. त्यात त्याने ‘अरमानने माझी हत्या केली’ असे लिहिले होते. त्यानंतर ९ एप्रिल रोजी एसआयटीने अरमानला अटक केली.
जातीभेदावरून आरोपीने मृत व्यक्तीला छळले, असे दाखवणारे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले नाहीत. एक पेपर कटरची घटना वगळता अन्य ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे आरोपीनेच मृत व्यक्तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असा निष्कर्ष काढू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले. आरोपी १९ वर्षांचा असून, त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. सबब त्याला आणखी ताब्यात ठेवण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.