Join us

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; भरपूर पाणी पिण्याचे डॉक्टरांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 9:48 AM

उन्हाचा कडाका वाढला; भरपूर पाणी पिण्याचे डॉक्टरांचे आवाहन.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. त्यामुळे दुपारच्या काळात नागरिक घामाच्या धारांमुळे प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. तसेच त्यात प्रदूषण आणि वाहतुकीचा गोंगाट असल्याने नागरिकांमध्ये चिडचिड वाढली आहे. त्यामुळे या गरम वातावरणात आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर योग्य प्रमाणात पाणी पिण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जर पाणी कमी प्यायले गेले तर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

वातावरणात अचानक बदल झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे सध्या मार्च महिना सुरू आहे. अजून खरा उन्हाळा सुरू व्हायचा आहे. त्याआधीच तापमानात मोठे बदल झाल्याने नागरिकांची अंगाची लाही होत आहे. त्यामुळे मे-जून महिन्यामध्ये काही परिस्थिती असेल यावरून नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.  दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर फिरणे मुश्कील झाले आहे.  

सध्या आताच पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे प्रथमतः रस्त्यावरील कुठलाही थंड द्रव्ये घेऊ नये. कारण त्यामध्ये विनाकारण जंतू असण्याची शक्यता आहे. ऊन आहे म्हणून सरबत, बर्फाचा गोळा खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे पोटदुखी, जुलाबसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात शक्यतो स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. टोपी घातली पाहिजे. कारण उन्हाळ्यात जास्त करून डिहायड्रेशन आणि पोटविकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे नागरिकांनी पाणी प्यायले पाहिजे. - डॉ. अमित नाबर, औषधवैद्यक शास्त्र तज्ज्ञ, फोर्टिस रहेजा रुग्णालय

आरोग्यावर होणारे परिणाम? 

डिहायड्रेशन, चक्कर येणे, हाता पाय दुखणे, पोटात मळमळणे, मूत्रविकाराच्या समस्या, किडनी स्टोन, उलट्या, जुलाब या आरोग्याच्या समस्यांना नागरिक आणि लहान मुलांना सामोरे जावे लागते.

काय केले पाहिजे? 

१)  या काळात म्हणजे २-३ लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. 

२)  नारळ, ताक, दही, लस्सीचे सेवन करावे. 

३) ताज्या फळाचा ज्यूस घ्यावा. फळे कापून खावीत. 

४) रस्त्यावरचे पाणी, सरबत शरीरासाठी हानीकारक आहे. ते पिऊ नये. 

५) लिंबू पाणी, चक्कर आल्यास ओआरएसचे पाणी प्यावे. 

हलका आहार देणे गरजेचे :

१) सध्या मुलाच्या परीक्षांचे दिवस आहेत. त्यामुळे मुलांना रोज शाळेतून ये-जा करताना या वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागत आहे. या वातावरणात मुलांना भूक लागत नाही. त्यामुळे खाण्याच्या तक्रारी वाढत आहेत. मुलांना पचेल असा हलका आहार देणे गरजेचे आहे. 

२) बाहेर ये-जा करताना सगळ्यांनीच टोपी घातली आहे. अनेक जण लघवीला जावे लागते म्हणून जास्त पाणी पीत नाही, मात्र ते चुकीचे असून सर्वांनीच मुबलक प्रमाणात पाणी गरजेचे असते. पाणी  आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पचनप्रक्रिया व्यवस्थित राहते.

टॅग्स :मुंबईहेल्थ टिप्स