मुंबई - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनाम वीरांची आणि त्यांच्या साहसाची गाथा सांगणारी 'स्वराज' ही मालिका ओटीटीद्वारे सर्वदूर पोहोचणार असल्याचा अभिमान आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनाम स्वातंत्र्यवीरांचा परिचय या ७५ भागांच्या मालिकेत आहे. वसाहतवादाचा अर्थ, मूळ आणि परिणाम समजून घेण्यास मालिका मदत करेल असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले. 'स्वराज' मालिकेच्या पहिल्या सीझनचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत बनवलेल्या 'सरदार : द गेम चेंजर' या दूरदर्शनवरील मालिकेचे प्रसारणही करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आझादी का अमृत महोत्सव' या राष्ट्रीय अभियानापासून प्रेरणा घेऊन दोन्ही मालिका बनवण्यात आल्या आहेत. 'स्वराज' मालिका भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील शौर्याच्या कथा सांगणारी आहे. या मालिकेत १४९८ मध्ये वास्को द गामाच्या आगमनापासून ते १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा भारताचा प्रवास दाखवण्यात आला आहे. इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेली युद्धे यात पाहायला मिळणार आहेत. १४ ऑगस्ट २०२२ रोजी डीडी राष्ट्रीय वाहिनीवर सुरुवातीला हिंदी आणि नंतर तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, बंगाली, ओडिया आणि आसामी या नऊ प्रादेशिक भाषांमध्ये 'स्वराज' मालिका प्रसारीत झाली आहे. डिजिटल प्रसारणासाठी हि मालिका कॉन्टिलो पिक्चर्स प्रॉडक्शन हाऊसकडे सोपवण्यात आली आहे. 'स्वराज' आता ओटीटीवर उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात याचे १० भाग प्रसारीत होतील. यात मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि गुजराती या सात प्रादेशिक भाषांचाही समावेष असेल. प्रेक्षकांच्या सोयीसाठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत सबटायटल्स अर्थात उपशीर्षकेसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दूरदर्शनवर 'सरदार : द गेम चेंजर' ही ५२ भागांची नवीन मालिका सुरु केल्याचे सांगत ठाकूर म्हणाले की, माध्यमांसोबतच मनोरंजन क्षेत्राची भरभराट व्हावी आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी उंची गाठण्यासाठी सक्षम बनावे यासाठी सहाय्य करण्यावर सरकारचा भर आहे. चित्रपट उद्योगासाठी व्यवसाय सुलभतेचा उपक्रम, भारतात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी 'सिंगल विंडो क्लिअरन्स'सारख्या इतर विविध प्रोत्साहनपर योजनांवरही त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी सर्वांना भारतीय भाषांमध्ये आशय संपन्न सामग्री तयार करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, आजच्या हायपरकनेक्टेड जगात जागतिक प्रेक्षकांसाठी भाषेचा अडथळा नाही. भारतीय प्रादेशिक सिनेमाने भौगोलिक मर्यादा पार केली आहे आणि आशय संपन्न सामुग्रीच्या आधारावर तो जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भागधारकांनी भारताला 'आशयसंपन्न सामुग्रीचे जागतिक केंद्र' बनवावे असे आवाहन त्यांनी केले.