Join us

स्वच्छतेच्या बाबतीत मुंबई महापालिकेचे 'लक्ष्य' देशात 'टॉप टेन'

By जयंत होवाळ | Published: January 27, 2024 6:32 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

मुंबई: देश आणि राज्य स्तरावर स्वच्छता अभियानाच्या क्रमांकात झालेली घसरण आणि स्वच्छता अभियानासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी लक्षात घेता मुंबई महापालिका प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे. स्वच्छता अभियानात देशात टॉप टेन मध्ये येण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. टॉप टेन उद्दिष्ट गाठण्यासाठी विभागांतर्गत स्वच्छतेबाबत स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत. मोहिमेला चालना देण्यासाठी शिंदे यांनी नुकतीच बैठक घेतली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. दररोज एक हजार किलोमीटरचे रस्ते पाण्याने धुऊन स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी पाण्याचे टँकर वाढविण्याची गरज आहे. महामार्ग, प्रमुख मार्ग यांच्या बरोबरच अंतर्गत रस्ते, गल्ली बोळ, रस्ता दुभाजक पाण्याने धुतले पाहिजेत. त्यासाठी विभागस्तरावर सर्वंकष आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी करावी. विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपला विभाग पिंजून काढावा. दररोज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत 'ऑन फिल्ड' उतरावे. एवढेच नव्हे तर स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये मिसळा , असे निर्देश शिंदे यांनी दिले.

मुंबई महानगरपालिका देशातील अग्रगण्य व महत्त्वाची महानगरपालिका आहे. स्वच्छ, सुंदर, हरित शहर म्हणून महानगरपालिकेची ओळख आहे. सार्वजनिक स्वच्छतेतही महानगरपालिका अग्रेसर आहे. स्वच्छता अभियानात देशात 'टॉप टेन' मध्ये येण्याची महानगरपालिकेची क्षमता आहे. स्वच्छतेबाबतच्या जमेच्या बाजू अधिक प्रबळ करत आता विभागांमध्ये स्वच्छतेविषयी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन केले जाणार आहे. घरोघरी ओला-सुका कचरा विलगीकरण करण्यासाठी भर दिला जावा, विभागपातळीवर स्वच्छता दूत नेमावेत. ओला-सुका कचरा विलगीकरण, रस्ते स्वच्छता, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यावर जास्तीत-जास्त लक्ष केंद्रीत केल्यास महानगरपालिका स्वच्छता अभियानात देशात पहिल्या दहामध्ये अर्थात 'टॉप टेन' मध्ये येईल. त्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. स्वच्छता कामात कोणीही हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :मुंबई