Join us

मुंबईकर यंदाही नोटाला मतदान करणार का? फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 11:11 AM

मुंबईत २०१९ च्या विधानसभेत आरेतील वृक्षांच्या रातोरात कत्तलीचा विषय अनेकांना नोटाच्या पर्यायाकडे घेऊन गेला होता.

रेश्मा शिवडेकर, मुंबई : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार, आरेतील वृक्षतोडीसारखा भावनिक मुद्दा, आयाराम गयारामांचे राजकारण इत्यादी तात्कालिक कारणांमुळे नोटा म्हणजे ‘या पैकी कुणीही नाही,’ या पर्यायाचे बटन दाबून मतदानाचा अधिकार बजावणाऱ्यांची संख्या मुंबईत वाढताना दिसून येत आहे.

मुंबईत २०१९ च्या विधानसभेत आरेतील वृक्षांच्या रातोरात कत्तलीचा विषय अनेकांना नोटाच्या पर्यायाकडे घेऊन गेला होता. त्यावेळेस मुंबईत तब्बल २.८८ टक्के इतके मतदान नोटाला झाले होते. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेले मुंबईकर नोटाला किती पसंती देतात, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. ‘नोटा म्हणजे दात नसलेला वाघ,’ असे वर्णन ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’चे (एडीआर) मेजर जनरल (निवृत्त) अनिल वर्मा यांनी केले होते. 

२०२२ मध्ये मुंबईत झालेल्या पोटनिवडणुकीत नोटाचा गैरवापरही झाल्याची तक्रार होती. असे असले तरी मुंबईत नोटाला मत देणाऱ्यांचे प्रमाण गेल्या चार निवडणुकीत वाढलेले दिसून येते. मतदारांच्या या विशेष अधिकाराबाबत निवडणूक आयोगाकडून जाणीव जागृती केली जाते. महाराष्ट्रात नोटाला होणारे मतदान सीपीआय (मार्क्सवादी), समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आदी पक्षांना झालेल्या मतदानापेक्षाही अधिक आहे.

२०१३ साली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने नोटाचा पर्याय मतदारांना मिळाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा हा पर्याय देण्यात आला. पहिल्याच निवडणुकीत मुंबईत ५२,९५२ मतदारांनी हा अधिकार बजावला. त्यावेळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे सुमारे ११ हजार मतदारांनी नोटाला मतदान केले होते.

गेल्या चार निवडणुकीतील नोटाची आकडेवारी-

१)   लोकसभा २०१४ - ५२,९५२ (एकूण मतदानाच्या १.०५ टक्के)

२) विधानसभा २०१४ - ६५,७३५ (एकूण मतदानाच्या ०.६४ टक्के)

३)  लोकसभा २०१९ - ८२,२७५ (एकूण मतदानाच्या १.५५ टक्के )

४) विधानसभा २०१९ - १,४७,१०६ (एकूण मतदानाच्या २.८८ टक्के)

आरेतील झाडांची कत्तल नोटावाढीला कारणीभूत-

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नोटाला सर्वाधिक मतदान  जोगेश्वरीत झाले होते. त्यावेळी मेट्रो कारशेडकरिता आरे कॉलनीतून सुमारे दोन हजार झाडे एका रात्रीत कापण्याचा निर्णय गाजला होता. त्या आंदोलनामुळे अनेकांनी नोटाला मत देऊन नाराजी व्यक्त केली होती. जोगेश्वरी खालोखाल बोरीवलीत नोटाला (१०,०९५) मतदान झाले होते.

‘नोटां’च्या बदल्यात नोटा-

१) मुंबईत २०२२ साली अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत उद्धव सेनेचे आमदार अनिल परब यांनी ‘नोटा’ देऊन नोटा देण्याचा प्रकार घडल्याची तक्रार केली होती. 

२) या निवडणुकीत उद्धव सेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात उमेदवार देण्याचे शिंदे सेनेने टाळले होते. त्यावेळी लटके यांच्या खालोखाल नोटाला १२ हजाराहून अधिक मते मिळाली होती.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४भारतीय निवडणूक आयोग