मुंबई उत्तर पश्चिम, दक्षिणमध्ये ‘नोटा’ला सर्वाधिक पसंती; मतदारांची उमेदवारावर ना पसंतीची मोहोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:15 AM2024-04-01T10:15:46+5:302024-04-01T10:16:53+5:30
२०१९ ची लोकसभा निवडणूक : निकालावर फारसा परिणाम नाही.
मुंबई : निवडणुकीच्या रिंगणातील कोणताही उमेदवार योग्य वाटत नसल्याने ना पसंतीची मोहोर उमटवण्याचा अधिकार ‘नोटा’च्या निमित्ताने मतदाराला मिळतो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदारांनी त्याचा वापर केला होता. त्याखालोखाल मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या संख्येने आपल्याकडील उमेदवारावर ना पसंतीची मोहोर उमटवली होती. मात्र मुंबईत झालेल्या एकूण मतदानात ‘नोटा’ने कुठेही दोन टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविलेली नाहीत, हे विशेष.
‘नोटा’ म्हणजे वरीलपैकी कुणीही नाही. २०१९मध्ये मुंबईत सहाही लोकसभा मतदारसंघांत मिळून सुमारे ८२ हजारांहून अधिक मतदारांनी ‘नोटा’चा अधिकार बजावला होता. ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात झाले होते. येथील १८ हजार २२५ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले होते. हे प्रमाण एकूण मतदानाच्या १.९४ टक्के इतके आहे.
१) २०१९च्या निवडणुकीत महाराष्ट्रात ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान पालघरमध्ये झाले होते. तिथे २९ हजार ४७९ मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले होते.
२) त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील २२ हजार ६३२ मतदारांनी नोटाला मतदान केले.
३) गडचिरोलीत २४ हजार ५९९ इतके ‘नोटा’ला मतदान झाले. त्यानंतर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मतदान झाले आहे.
दक्षिण मुंबईतील १५ हजार ११५ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. हे प्रमाण १.८९ टक्के इतके आहे.
‘नोटा’ दुसऱ्या क्रमांकावर -
नोव्हेंबर २०२२ मध्ये अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नोटा दुसऱ्या क्रमांकावर होता. यात विजयी ठरलेल्या उद्धव सेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना एकूण ६६ हजार ५३० मते मिळाली होती. त्यांच्याविरोधात शिंदेसेना किंवा मनसेने उमेदवार देण्याचे टाळले होते. त्यामुळे ही लढत तशी एकतर्फीच होती. त्यामुळे ‘नोटा’ १२ हजार ८०६ इतके मते मिळवून दुसऱ्या स्थानावर होता.
१) सर्वोच्च न्यायालयाने ११ वर्षांपूर्वी ‘नोटा’चा अधिकार मतदारांना दिला.
२) मात्र त्याचा निवडणुकीच्या निकालांवर अजूनही फारसा प्रभाव पडलेला नाही.
३) मुंबईत दोन टक्क्यांहून अधिक मते ‘नोटा’ला मिळालेली नाहीत.