मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्हीआयपी बंदोबस्तात तैनात असलेल्या एका पोलिसाला तीन दात गमवावे लागले. हा प्रकार बोरिवली पूर्वच्या श्रीकृष्णनगर पादचारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान म्हणजे शनिवारी घडला.
कस्तुरबा पोलीस ठाण्यात अमोल अनंत यद्रे (४०) हे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असून ते पालघरच्या विरार परिसरात राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, ११ मार्च रोजी ते रात्रपाळीवर होते. त्यादिवशी त्यांच्याकडे व्हीआयपी बंदोबस्त होता कारण मुख्यमंत्री शिंदे हे बोरवली परिसरात येणार होते. त्यानुसार सर्व अधिकारी आणि अंमलदार यांना वरिष्ठांनी ५ वाचताच बंदोबस्तासाठी बोलावले. ज्यात यद्रे यांना ओंकारेश्वर जंक्शन हा पॉईंट देण्यात आला. तेव्हा त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक कोरगावकर, सहायक फौजदार चव्हाण, खराडे तसेच अन्य सहकारी हजर होते. यद्रे हे त्याच रात्री जवळपास ८.४५ च्या सुमारास श्रीकृष्णनगर ब्रिज समोर पश्चिम द्रुतगती महामार्गावरून रस्ता ओलांडून जात असताना वर्धा वेगाने आलेल्या एक्टिवा गाडीने त्यांना जोरदार धडक दिली.
ज्यात यद्रे व मोटर सायकलस्वार हे दोघेही खाली पडले आणि त्यांना दुखापत झाली. यद्रेच्या उजव्या गुडघ्याला खर्चटल्याने त्यांना सहकाऱ्यांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांचे खालचे तीन दात निखळल्याने ते काढण्यात आले तर ओठांना देखील दोन टाके मारण्यात आले. स्कुटीचालक मनीष रोहिदास आबनावे (३२) याच्यावरही उपचार करत त्याच्यावर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० चे कलम २७९ आणी ३३८ नुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आबनावे हा व्यवसाय प्लंबर असून दहिसरच्या रावळपाडा येथील राहणारा असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.