लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - इस्त्रायल-गाझा किंवा रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शाहिर निदा फाजली यांनी लिहिलेले 'रौशनी के फूल' हे पुस्तक अत्यंत गरजेचे आहे. एकूणच धर्माधर्मांमध्ये वाढणारा असंतोष, जागतिक युद्ध आणि दिवसेंदिवस हातपाय पसरणारा दहशतवाद पाहता हे पुस्तक प्रत्येकाने वाचणे गरजेचे असल्याचे मत गझलकार प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले. 'रौशनी के फूल' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
अंधेरीतील भवन कल्चरल सेंटरमध्ये निदा फाजली लिखित 'रौशनी के फूल' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बीसीसी आणि वाणी प्रकाशन यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला गुजराती कवी अनिल जोशी, इन्कलाबचे संपादक शाहिद लतीफ, ज्येष्ठ शाहिर अख्तर आझाद आणि राजेश रेड्डी, हिंदी कवी सुभाष काबरा, हरि मृदुल, मैथिलीच्या कवयित्री विभा राणी, अर्चना जौहरी, नवीन चतुर्वेदी, असीमा भट्ट, अमर त्रिपाठी, आभा दवे, निदा यांच्या पत्नी मालती जोशी फाजली, मुलगी तहरीर आणि वाणी प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक अरुण माहेश्वरी उपस्थित होते.
निदा फाजली यांच्याबाबत निफाडकर म्हणाले की, निदा कधीही असत्याला सत्य म्हणाले नाहीत. त्यांनी कधीच आपले शब्द दुसऱ्याच्या तराजूत तोलले नाहीत. त्यांच्या जाण्याने निधर्मी माणसांचे खूप नुकसान झाले आहे. हे पुस्तक केवळ वाचनीय नसून, मननीय आणि चिंतनीयही असल्याची भावनाही निफाडकरांनी व्यक्त केली. शाहिद लतीफ निदांबाबत म्हणाले की, गरजवंतांना मदत करण्यात निदा कायम आघाडीवर असायचे. ते उत्तम शाहिर होतेच, पण त्याहीपेक्षा ते चांगले माणूसही होते. मी त्यांना अनेकदा गरजवंतांना मदत करताना पहिले आहे. तेव्हा खरे गरजवंत निदा असतानाही ही मदत होत होती हे विशेष आहे.
यावेळी आयोजित संगीतीक कार्यक्रमात कुलदीप सिंह, घनश्याम वासवानी, अशोक खोसला, शिवानी वासवानी, आल्हाद काशीकर, जसविंदर सिंह आणि मालती जोशी फाझली यांनी निदा फाझली यांच्या गझल गायल्या. देवमणी पांडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .