मुंबई : पूर्व उपनगरातील भांडुप ते विक्रोळी पट्ट्यातील नागरिकांना आणखी मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळणार आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्लांट वगैरे उभारला जाणार नाही. तर निसर्गातुन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे भरपूर ऑक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता असणाऱ्या ८१०० बांबूंची लागवड या पट्ट्यात मुंबई महापालिका करणार आहे. त्यानंतर संपूर्ण मुंबईत विविध भागात पाच लाख बांबूंची लागवड केली जाणार आहे.या उपक्रमासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ३५४.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर २०२४-२५ सालच्या अर्थसंकल्पात १७८.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेच्या उद्यान विभागातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. पालिकेने हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितकरण प्रकल्प हाती घेतला असून त्याअंतर्गत बांबू लागवड केली जाणार आहे. भांडुप ते विक्रोळी पट्ट्यात बांबूची झाडे लावल्यानंतर पुढील टप्प्यात मुंबईच्या अन्य भागात बांबूचे रोपण होईल. त्यासाठी जागांचा शोध घेतला जाणार आहे. लागवडीत बांबूच्या सुमारे १६०० जाती असून ज्येष्ठ शेतकरी नेते पाशा पटेल यांचे सहकार्य या उपक्रमासाठी घेतले जाणार आहे.
बांबूच का ?
बांबूमधून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती होते असे असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बांबूची लागवड होत आहे. सध्या प्रदूषणामुळे मुंवईचे वातावरण खराब झाले आहे. प्रदूषण वाढले आहे. धुळीचे प्रमाण वाढले आहे. हवेचा दर्जा घसरला आहे. प्रदूषण रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. या पार्शवभूमीवर बांबूमधून मिळणार ऑक्सिजन लाभदायक ठरेल. पूर्व उपनगरात घाटकोपर ते विक्रोळी या परिसरात महामार्गालगत तिवरांची राने मोठ्या प्रमाणावर आहेत. पाणथळ जागा आहेत. भरपूर वृक्षराजी आहे. त्यात आता बांबूची भर पडल्याने दूषित वातावरण कमी होण्याची अपेक्षा आहे