Join us

सुट्ट्यांच्या तोंडावर लालपरीची गेली लाली, कारभार मंदावला

By नितीन जगताप | Published: April 08, 2023 12:42 PM

पुन्हा कागदी तिकिटांची नामुष्की, कर्मचाऱ्यांचीही कमतरता

नितीन जगताप, लोकमत न्यूज  नेटवर्क, मुंबई: लवकरच शाळांना सुट्ट्या लागतील. मग, मामाच्या गावाचे वेध लागतील. आरक्षणावर उड्या पडतील. बाहेरगावी जाण्यासाठी अजूनही एसटीलाच मोठी पसंती आहे. परवडणाऱ्या दरात विश्वासार्ह प्रवास करण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु, या लालपरीचा कारभार सुट्ट्यांच्या तोंडावर मंदावल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून मागविलेली इलेक्ट्रॉनिक यंत्रे अनेक ठिकाणी खराब झाली असून कर्मचारी आणि गाड्यांच्या कमतरतेचाही एसटी महामंडळ सामना करत आहे. इलेक्ट्रॉनिक मशीन अभावी अनेक ठिकाणी पुन्हा कागदी तिकीटेच द्यावी लागत असून कर्मचारी आणि गाड्यांच्या कमतरतेमुळे प्रवासी रेल्वे किंवा खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. परिणामी, एसटीला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागणार असल्याचे दिसत आहे.

एसटी महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिनमध्ये विशिष्ट सॉफ्टवेअर बसवले आहे. यातून कागदी तिकिटे बाहेर येतात. किती प्रवाशांना तिकिटे दिली, एकूण किती पैसे जमा झाले, तारीख, वार, वेळ या नोंदणीसह सर्व हिशेब एसटी महामंडळाकडे जमा होतो. प्रवाशांना झटपट तिकिटे मिळतात. असे हे मशिन वाहकांसाठी जरूर वरदान ठरले मात्र कालांतराने मशिन बंद पडणे, बटणे खराब होणे, छापील रक्कम फुसट होणे, कागदी रिल अडकणे, अशा अनेक तक्रारी दहा वर्षांपासून येऊ लागल्या आहेत.

मुंबई भागामध्ये प्रवाशांना उच्च आणि सहज अशी सेवा देण्याकरिता मुबलक प्रमाणात कर्मचारी उपलब्ध नाहीत. ज्या विभागांमध्ये जवळपास ३०० चालक आवश्यक आहे तर जवळपास २०० वाहक कमी आहेत तीच बाब यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील आहे. यांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात तुटवडा असून त्याचा परिणाम गाड्यांच्या नादुरुस्तीच्या देखभालीवरती होत आहे. तसेच मुंबईत एकूण प्रत्येकी २० असे १०० गाड्यांची कमतरता आहे.

आवश्यक मशीन - उपलब्ध मशीन

मुंबई सेंट्रलआवश्यक    २०० उपलब्ध    १३०कमी    ७०

परळ आवश्यक    २५० उपलब्ध    १४०कमी    ९०

कुर्ला नेहरूनगरआवश्यक    १८० उपलब्ध    १२०कमी    ६०

पनवेलआवश्यक    १५० उपलब्ध    १२०कमी    ३०

उरणआवश्यक    १२० उपलब्ध    १००कमी    २०

नवीन मशिन्सना बँकेची जोड नाही

  • पुरेशा ईटीआयएम मशिन्स तातडीने पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. काही विभागात नविन मशिन्स आल्या आहेत मात्र बॅंकेशी सलग्नता नसल्याने त्या पडून असल्याचे समजते.
  • तसेच नवीन महीला सन्मान योजनेमुळे त्यांना ५० टक्के सवलत द्यायची आहे मात्र हे तिकीट मशिनमधून काढताना चार पाच बटणे वापरावे लागतात. त्यामुळे त्या मशिनमध्ये सेटींग करून घेणे आवश्यक आहे.
  • जीवाची बाजी लावून कोरोना काळात काम केले. त्याचा कोविड भत्ता सरसकट अदा करण्यात यावा.
  • प्रवाशांना दर्जेदार व वेळेवर प्रवास देण्यासाठी नवीन स्वमालकीच्या गाड्यांचा पुरवठा करावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, मुंबई विभागाचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.
टॅग्स :एसटी