मालवणीतील घटनेप्रकरणी खा. गोपाळ शेट्टीचं पोलीस उपायुक्तांना पत्र
By मनोहर कुंभेजकर | Published: April 1, 2023 03:31 PM2023-04-01T15:31:40+5:302023-04-01T15:32:05+5:30
पोलिसांमार्फत रामनवमीच्या मिरवणुकीवर बंधन घेतल्यास भाजप कडाडून विरोध करेल
मुंबई - मालवणी परिसरात रामनवमी निमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या संख्येने नागरिकांनी मिरवणूक काढली होती. काही कार्यकर्त्यांनी सायंकाळी ०६.३० वाजता मिरवणूक मस्जिदी समोरून पुढे जाणार होती. मात्र पोलिसांनी रामनवमी मिरवणुकीवर बंधन घालून घेणे हे आजही पटण्यासारखे नाही. उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त अजय बन्सल यांना मालवणीच्या घटने प्रकरणी पत्र दिले आहे.
कॉग्रेस राजवटीत लांगून- चालन धोरण स्विकारून अल्पसंख्याक समाजाला कायदयाच्या विरोधात जावून हिंदू समाजावर दडपण निर्माण करून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यापासून वंचित ठेवण्याचे काम गेली अनेक दशके राबविण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत ऐतिहासिक निर्णय केल्यानंतरही पोलिसांमार्फत रामनवमीच्या मिरवणुकीवर बंधन घालण्याचे काम यापुढे झाल्यास भारतीय जनता पार्टी कडाडून विरोध करेल असा इशारा उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्राद्वारे दिला आहे.
सरकारने रामनवमीची सुट्टी हिंदू नागरिकांना घरात बसून भजन करण्यासाठी जाहिर केलेली नसून उत्साहाने मिरवणुक काढून हिंदू संस्कृतीला आणखी मजबुत करण्यासाठी दिली आहे हे पोलीसांनी कृपया हे लक्षात घेणे गरजेचे असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. भारतासारख्या देशात बहुसंख्यांक नागरिकांनी ठरवलेल्या कार्यक्रमात कोणीतरी काहीतरी म्हणतो म्हणून आपण आपल्यावरती बंधने लादून घेणे हे आपल्याला अजिबात पटत नाही. सामंजस्याने सर्व समाजातील नागरिकांनी मिळून त्या त्या समाजातील कार्यक्रम भाऊबंदकीने-साजरे करायला हवेत. पोलीस व्यवस्थेला देखील आयोजकांनी मदत करायला हवी असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
अल्पसंख्याक समाजातील बांधवांना (दोन जाती- धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे) आपल्या दालनात संयुक्त बैठक आमंत्रित करावी आणि अशा प्रसंगी त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासंबंधी सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे असे मत त्यांनी या पत्रात मांडले आहे. तसेच येणाऱ्या काळात अशा प्रसंगी दोन्ही समाजामध्ये होणारा मोठा तणाव, तेढ तसेच अनुचित प्रकार टाळण्याकरीता आपण सर्वांनी याचा आधीच विचार करून एक धोरण ठरवावे अशी भूमिका खासदार गोपाळ शेट्टी यांनी विषद केली.