मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची तूट जास्त असल्याने चिंतेचे वातावरण आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात मात्र तुरळक पाऊस सुरू असल्याने थेंबे थेंबे तळे साचे... अशी दिलासा देणारी बाब आहे. सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेले काही दिवस पावसाचा मुक्काम आहे. त्यामुळे तलावातील पाणीपातळी वाढत आहे.
शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठा ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. अपर वैतरणा तलाव खूपच पिछाडीवर आहे. हा तलाव जेमतेम ७८ टक्के भरला आहे. तलाव क्षेत्रात दररोज ४५ ते ५० मिमी पाऊस होतो. त्यामुळे पाण्याच्या पातळीतही वाढ होत आहे. सर्व तलावांतील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. तानसा आणि मोडक सागर हे तलाव सर्वात आधी भरतात. याही वर्षी ते भरले.
- सर्व तलावांतील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला. मात्र, जवळपास १५ ते २० दिवस पावसाने दडी मारल्यामुळे या तलावातील पाण्याची पातळी घटली होती. पाऊस पुन्हा सुरू झाल्यामुळे हे दोन्ही तलाव पुन्हा पूर्ण भरले आहेत. मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी हे चार तलाव भरले असून, अपर वैतरणा, मध्य वैतरणा व भातसा तलावाने अजून ती पातळी गाठलेली नाही.