लोकमत इम्पॅक्ट! आरे कॉलनीच्या तलावातच यावर्षी सुद्धा परंपरा कायम राखत सार्वजनिक व खासगी गणपतींचे विसर्जन होणार
By मनोहर कुंभेजकर | Published: August 18, 2023 05:49 PM2023-08-18T17:49:54+5:302023-08-18T17:50:14+5:30
मुंबई : आरे वसाहतीतील तलावांमध्ये यावर्षी गणपती विसर्जनाला परवानगी मिळणार नाही, असे पत्र आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेस ‘वनशक्ती’ या संघटनेच्या ...
मुंबई : आरे वसाहतीतील तलावांमध्ये यावर्षी गणपती विसर्जनाला परवानगी मिळणार नाही, असे पत्र आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेस ‘वनशक्ती’ या संघटनेच्या आग्रहावरून पाठवले आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ बदलावा अशी मागणी कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
याबाबत सर्वप्रथम काल लोकमत ऑनलाईन आणि आजच्या लोकमतच्या अंकात याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.लोकमतचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्याचे सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षांमध्ये आणि गणेश भक्तांमध्ये संतप्त प्रतिसाद उमटले.
आरे वसाहतीच्या तलावांमध्ये गेले कित्येक वर्षांपासून गणपती विसर्जन केले जाते आणि त्यामुळे ‘वनशक्ती संघटना’ ही नेहमीच हिंदू समाजाच्या आणि विकासाच्या प्रश्नांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोपही आमदार. भातखळकरांनी या पत्राद्वारे केलेला आहे. ही बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी त्यांनी केली असून, जर का ही बंदी आरे प्रशासनाने उठवली नाही तर या विरोधामध्ये आंदोलन करावे लागेल असे ही त्यांनी सांगितले आहे. कुठल्याही परिस्थिती मध्ये आरे कॉलनीच्या तलावातच यावर्षी सुद्धा परंपरा कायम राखत सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल हे सुद्धा त्यांनी ठामपणे सांगितले.