"५५ वर्षात सर्वाधिक आरोप पवार कुटुंबीयांवर झाले, आमचा कोणी विचार केला का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 06:12 PM2022-11-09T18:12:31+5:302022-11-09T18:30:18+5:30
गेल्या ५५ वर्षात सर्वाधिक आरोप पवार कुटुंबीयांवरच झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली.
मुंबई - शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यावरुन राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोकेवरुन टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिल्याचे समोर आले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. आता, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, गेल्या ५५ वर्षात सर्वाधिक आरोप पवार कुटुंबीयांवरच झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली.
"महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात. परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आता पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच, संजय राऊत यांना जामीन मिळाल्यावरही त्यांनी सत्यमेव जयते असे म्हटले आहे.
आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शरद पवारांनी गेली ५५ वर्षे महाराष्ट्राची आणि देशाची सेवा केली आहे. तोच आदर्श घेऊन आम्हीही पुढे काम करत आहोत. मी कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही, वर्तमानपत्रात एखादी गोष्ट आली, टेलीव्हीजन चॅनेल्सवर आलं किंवा एखादा जबाबदार आमदार जेव्हा बोलतो, तेच आम्ही बोलतो. ५० खोक्यांचा हा आरोप आम्ही नाही केलेला, मी इतक्या वर्षात कधीही कुणावर बिनबुडाचे आरोप केले नाहीत. कारण, माझी विश्वासर्हता आहे ती, मी कशी कोणावर आरोप करेल. आमच्यावर लोकांनी दिलदारपणे आरोप केले. आम्ही कधी म्हटलं का पुराव द्या, आम्ही शांत राहिलो, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्राच्या ५५ वर्षांच्या राजकीय इतिहासात सर्वात जास्त आरोप कुठल्या कुटुंबीयांवर झालेले असतील तर ते आमच्यावर आहेत. आमचा कधी कोणी विचार केला? आमच्या कुटुंबातील लोकांना काय वाटलं असेल?. पण, आम्ही कधीच काही बोललो नाही, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले.
सत्यमेव जयते
आमचा विश्वास न्यायप्रक्रियेवर होता, आज न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे. सत्यमेव जयते... असे म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. आमच्या संघर्षाच्या काळात आमच्या लेकी-सुना खूप धैर्याने लढत आहेत, त्यांचा मला अभिमान आहे. मी छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांना जवळून अनुभवलंय, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
अजित पवार नॉट रिचेबल ही बातमी चुकीची
अजित पवार नॉट रिचेबल ही बातमी चुकीची आहे, ते चॅनेल्सवाल्यांसाठी नॉट रिचेबल आहेत. प्रत्येक माणसाला एक व्यक्तीगत आयुष्य असतं. पण, चॅनेल्स एवढे असंवेदनशील झाले आहेत की, एखादा माणूस पर्सनल कामासाठी गेला असेल तर त्याची एवढी मोठी राजकीय बातमी करता. अखेर तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही देऊ शकता, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार व्यक्तीगत कामात असल्याचे स्पष्ट केले.