"लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 09:30 AM2024-02-16T09:30:46+5:302024-02-16T12:22:13+5:30

‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

In the Lok Sabha elections, all the three parties in the Grand Alliance will contest on their respective symbols | "लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढणार"

"लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढणार"

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार नाहीत. शिवसेनेला धनुष्यबाण, तर राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले असल्यामुळे त्यांच्या पक्षाचे खासदार त्याच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली

‘लोकमत’च्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डाॅ. विजय दर्डा व मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी फडणवीस यांना वेगवेगळे प्रश्न विचारून बोलते केले. फडणवीस म्हणाले की, गेल्या काही दिवसांत शिवसेनेचे आमदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. पण तशी शक्यता नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना त्यांचे  अधिकृत चिन्ह मिळालेले आहे. तसेच अधिकृत पक्ष म्हणून मान्यताही मिळालेली आहे. त्यामुळे ते त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. 

मुख्यमंत्रिपदाचा निर्णय केवळ संख्याबळावर हाेणार नाही...
तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपला मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असले तरी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा केवळ संख्याबळावर होणार नाही, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री कोण होणार त्याचा निर्णय दिल्लीत पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षण हे आमचे वचन...
मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार हे आमचे वचन आहे. मात्र त्याच वेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिले होते. ते हायकोर्टात टिकले. मात्र, सुप्रीम कोर्टाने काही आक्षेप नोंदवले. ते आक्षेप किंवा त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असून त्या दूर करूनच मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा युती नाही
उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात राजकीय युती अशक्य आहे. कारण त्यांनी व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत खालच्या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका केल्यामुळे आता आमची मने दुखावली आहेत. भूमिका वेगळ्या असल्या तर भूमिका बदलून एकत्र येता येते. पण मनभेद झाले असतील तर राजकारणात एकत्र येता येत नाही, असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र हाच मोठा भाऊ आहे आणि राहणार
महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ आहे आणि राहणार, असा दावा फडणवीस यांनी केला. गुजरात महाराष्ट्राच्या पुढे जात आहे किंवा प्रगती करत आहे, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांत खूप मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत. 
विदेशी गुंतवणूकही वाढत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. लहान भाऊ पुढे गेला तर त्याचे मोठ्या भावाला दुःख असण्याचे कारण नाही. पण लहान भाऊ मोठ्या भावाला मागे टाकू शकत नाही हेच वास्तव आहे.

शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती

  • मागील विधानसभा निवडणुकीनंतर २०१९ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार स्थापन करण्याबाबत अजित पवार यांच्यासोबत नव्हे तर शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती, असे ठाम प्रतिपादन फडणवीस यांनी केले. 
  • शरद पवार यांनी ऐनवेळी माघार घेतली. मात्र, अजित पवार व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना ते मान्य नव्हते. या विषयावर मी लागलीच काही बोलू शकत नाही. 
  • कारण त्यावेळी ज्यांनी मदत केली त्यांचा विश्वासघात करण्यासारखे ते होईल. परंतु तीन-चार वर्षांनंतर ‘लोकमत’च्या व्यासपीठावर याबाबत आपण अधिक खुलासा करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: In the Lok Sabha elections, all the three parties in the Grand Alliance will contest on their respective symbols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.