उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यातील एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथील नवविवाहित दाम्पत्याने लग्नाचे फेरे घेतल्यानंतर पहिल्यांदा आपले घर गाठले नाही, तर चक्क मुलायमसिंह यादव यांच्या समाधीस्थळावर जाऊन माथा टेकला. येथे मुलायमसिंह यांना आदरांजली अर्पण केल्यानंतरच ते आपल्या घरी गेले. नवदाम्पत्याची लग्नानंतरच्या आयुष्याची ही सुरुवात सर्वांनाच आश्चर्य करुन टाकणारी व चर्चेची ठरली आहे.
बरनाहल ठाणे परिक्षेत्रातील घुसपूर गावातील हे प्रकरण आहे. गावातील माजी जिल्हा पंचायत समिती सदस्य सोबरनसिंह यादव यांचे सुपुत्र इंजिनिअर जतेंद्र यादव यांची वरात मंगळवारी बरनाहल येथे निघाली. बुधवारी लग्नावेळी त्यांच्या पत्नीने एक इच्छा नवरदेवाकडे व्यक्त केली. आपल्या सासरी जाण्यापूर्वी नेताजी मुलायमसिंह यादव यांच्या समाधीस्थळावर जाऊन आशीर्वाद घ्यायचा असल्याचं तिने म्हटले. नवरदेवानेही पत्नीची इच्छापूर्ती करण्याचं ठरवलं. त्यानुसार, लग्नगाठ बांधल्यानंतर, लग्नाचे फेरे घेतल्यानंतर नवरी मुलीची पाठवणी करताना, वऱ्हाड आपल्या घरी निघून गेलं. पण, नवरदेव यतेंद्र हे आपल्या पत्नी पलकला घेऊन थेट सैफई येथे पोहोचले. तेथे दोघांनीही नेताजी मुलायमसिंह यादव यांच्या समाधीस्थळावर माथा टेकवला.
दरम्यान, समाधीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतरच नवदाम्पत्य घरी गेलं. त्यावेळी, नव्या नवरीचा गृहप्रवेश मुलाच्या कुटुंबीयांना मोठ्या आनंदात केला.