Join us

एक कोटी ११ लाख ५३ हजार ग्राहकांनी भरले ऑनलाइन वीजबिल; नोव्हेंबर महिन्यात २२३० कोटींचा भरणा

By सचिन लुंगसे | Published: December 13, 2022 6:11 PM

नोव्हेंबर महिन्यात एक कोटी ११ लाख ५३ हजार ग्राहकांनी ऑनलाइन वीजबिल भरले. 

मुंबई : महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक कोटी ११ लाख ५३ हजार ७०३ लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यात ऑनलाईन पेमेंटचा पर्याय स्वीकारला आहे. या ग्राहकांकडून वीजबिलाच्या भरण्यापोटी एकूण २२३० कोटी सहा लाख इतकी रक्कम भरली आहे. प्रत्येक ग्राहकाला ऑनलाईन पेमेंटवर ०.२५ टक्के सवलत मिळत त्यामुळे ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

ऑनलाईन वीज बिल भरणा करण्यात कोकण प्रादेशिक विभागाचे ग्राहक आघाडीवर असून एकूण ४९ लाख २१ हजार ६९३ ग्राहकांनी १००१ कोटी १३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. तर याखालोखाल पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या ३३ लाख ७५ हजार ४७१ ग्राहकांनी ७५१ कोटी ८५ लाख इतका तर नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या १९ लाख ३३ हजार २५६ ग्राहकांनी २९९ कोटी १५ लाख इतका भरणा केला आहे. याचबरोबर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ९ लाख २३ हजार २८३ इतक्या ग्राहकांनी १७७ कोटी ९६ लाख इतका ऑनलाईन भरणा केला आहे. 

वीज ग्राहक संगणक किंवा मोबाईल ॲपच्या मदतीने वीज बिल भरू शकतात. यामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचतात. ग्राहक मोबाईल ॲप किंवा  संकेत स्थळावर चालू किंवा थकबाकीची देयके पाहू शकतात. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगदवारे वीजबील भरण्याची सुविधा आहे. ऑनलाइन वीजबील भरल्यास संगणकीकृत पावतीही ग्राहकाला मिळते. तसेच महावितरणचे मोबाइल ॲप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत असून ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. त्यामुळे वीज ग्राहकाला आपले वीज बिल केंव्हाही आणि कोठूनही भरता येते. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

  

टॅग्स :मुंबईवीजबिल