ऑक्टोबर महिन्यात २९ सिनेमांची बरसात, सिनेसृष्टीत उत्साहाचे वातावरण  

By संजय घावरे | Published: September 30, 2023 07:41 PM2023-09-30T19:41:23+5:302023-09-30T19:42:32+5:30

या महिन्यात हिंदी, मराठी, दाक्षिणात्य असे २९ सिनेमे रिलीज होणार असल्याने सिनेसृष्टीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

In the month of October, 29 films rained, there is an atmosphere of excitement in the cinema industry | ऑक्टोबर महिन्यात २९ सिनेमांची बरसात, सिनेसृष्टीत उत्साहाचे वातावरण  

ऑक्टोबर महिन्यात २९ सिनेमांची बरसात, सिनेसृष्टीत उत्साहाचे वातावरण  

googlenewsNext

मुंबई - 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत गणपती बाप्पांना निरोप दिला गेला आहे. गणेशोत्सवात सिनेमांवर आलेले विघ्न बाप्पा आपल्यासोबत घेऊन गेले आहेत. त्यामुळे मागच्या महिन्यातील सिनेमांचा दुष्काळ दूर होणार आहे. या महिन्यात हिंदी, मराठी, दाक्षिणात्य असे २९ सिनेमे रिलीज होणार असल्याने सिनेसृष्टीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ऑक्टोबरमध्ये २९ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने मागच्या महिन्यात आलेली मरगळ झटकून सिनेसृष्टीही रसिकांच्या सेवेसाठी सज्ज झाल्याने एकूणच चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात सिनेमांवर विघ्न येते, पण बाप्पा ते विघ्न हरण करतात आणि सिनेसृष्टी पुन्हा नव्या जोमाने रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होते असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यानुसार यंदाही ऑक्टोबरमध्ये सिनेमांनी गर्दी केली आहे. ६ ऑक्टोबरला 'आत्मपॅम्लेट', 'अंकुश', 'जर्नी' हे तीन मराठी सिनेमे रिलीज होणार आहेत. यापैकी परेश मोकाशी लिखित 'आत्मपॅम्लेट'कडून खूप अपेक्षा आहेत. दिग्दर्शक शिरीष राणेंचा 'दिल दोस्ती दिवानगी' आणि महेश नेने यांनी दिग्दर्शित केलेला 'डाक' हे दोन सिनेमे १३ ऑक्टोबरला रिलीज होणार आहेत. २० ऑक्टोबरला गाजलेल्या 'बॅाईज'चा चौथा भाग प्रदर्शित होईल. प्रथमेश परबचा 'सिंगल' आणि 'लंडन मिसळ' हे दोन सिनेमे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होतील. गौतमी पाटीलचा 'घुंगरू' हा चित्रपट देखील ऑक्टोबरमध्येच रिलीज होण्याची शक्यता आहे.

राजश्रीचा 'दोनों' हा महत्त्वाकांक्षी सिनेमा ५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सूरज बडजात्यांचा मुलगा अविनाशने दिग्दर्शनात पदार्पण करताना सनी देओलचा मुलगा राजवीर आणि पूनम धिल्लोंची मुलगी पलोमा यांना ब्रेक दिला आहे. अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज', भूमी पेडणेकर आणि कुशा कपिलाचा 'थँक्स फॅार कमिंग' आणि रघुबीर यादव यांचा 'रात्रीस' हे सिनेमे ६ ऑक्टोबरला रिलीज होणार आहेत. १३ ऑक्टोबरला फातिमा सना शेखचा 'धक धक', संजय निरंजन दिग्दर्शित 'बॅाम्बे', संजय मिश्रांचा 'गुठली लाडू', करण पटेलचा 'डरन छू', 'हम तुम्हें चाहते हैं' आणि विनय पाठकचा 'भगवान भरोसे' असे अर्धा डझन चित्रपट प्रदर्शित होतील. १९ ऑक्टोबरला दाक्षिणात्य सुपरस्टार विजयचा 'लियो' आणि त्या मागोमाग २० ऑक्टोबरला तेजाचा बहुचर्चित 'टायगर नागेश्वर राव' आणि 'घोस्ट' हे साऊथचे सिनेमे येणार आहेत. याच दिवशी हिंदीत कंगना रणौतचा 'तेजस' आणि टायगर श्रॅाफचा 'गणपत - अ हिरो इज बॅार्न' या चित्रपटांमध्ये अटीतटीचा सामना होईल. या जोडीला दिव्या खोसला कुमारचा 'यारीयां २' आणि 'प्यार है तो है' हे चित्रपटही रिलीज होणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २७ ऑक्टोबरला मृणाल ठाकूर आणि अभिमन्यू दासानी यांचा 'आंख मिचोली', विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित आणि विक्रांत मेस्सी अभिनीत '१२ वीं फेल' आणि रजनीश दुग्गल यांचा 'मंडली' रिलीज होणार आहे.

सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. प्रसार आणि प्रचार जोमात सुरू झालेला आहे. 'आत्मपॅम्प्लेट' या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटाचे रसिकांकडून कसे स्वागत होते याची उत्सुकता आहे. एका सामान्य माणसाचे आत्मकथन जे जगाचे भविष्य बदलू शकेल असा 'आत्मपॅम्प्लेट' आहे. याचा शेवट गंमतशीर आणि वेगळ्या पातळीवर होतो. हा सिनेमा जास्तीत जास्त स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. थोडक्यात काय तर पुन्हा एकदा सिनेसृष्टी रसिकांच्या सेवेसाठी सज्ज झाल्याने एकाच वेळी खूप चित्रपट रिलीज होणार आहेत.
- परेश मोकाशी (लेखक-दिग्दर्शक)
 

Web Title: In the month of October, 29 films rained, there is an atmosphere of excitement in the cinema industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.