घर देण्याच्या नावाने पोलिसाला पोलिसानेच फसवले; पुणे लोहमार्ग पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:49 PM2023-08-03T12:49:05+5:302023-08-03T12:50:24+5:30
दादर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
मुंबई : दादरमध्ये घर मिळवून देण्याच्या नावाखाली, सेवानिवृत्त पोलिसाची १७ लाखांना फसवणूक केल्याच्या आरोपावरून पुणे लोहमार्ग पोलिस दलाच्या श्वान पथकातील उपनिरीक्षकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला आहे. दादर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ठाकुर्ली येथील रहिवासी असलेले रमेश गंगाराम सावंत (६३) हे २०१९ मध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून मुंबई पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले. सावंत यांच्या तक्रारीनुसार, ते दादर पोलिस वसाहतीत राहण्यास असताना, तेथे उपनिरीक्षक इमान उर्फ बाबा इकवाल पटेलही शेजारील इमारतीत राहण्यास होते. त्या दरम्यान पटेल यांनी एका पोलिसाला मुंबईत घर मिळवून दिल्याची माहिती मिळाली. २०१९ मध्ये सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांनीही पटेलकडे घराबाबत चौकशी केली.
पटेल यांनी, दादर येथे भवानी शंकर रोड येथे मालकीची मोकळी जागा असून तेथे बांधकाम सुरू असल्याचे सांगितले. तेथे ४५ लाखांत घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. १५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पटेल दादरच्या घरी आले. त्यांनी जास्तीत जास्त रक्कम देण्यास सांगितले. त्यानुसार, सुरुवातीला ७ लाखांचा धनादेश त्यांच्या नावे दिला. एका बाँड पेपरवर लेखी लिहून देण्यात आल्यामुळे त्यांचा विश्वास बसला. दोघांच्या बचतीतून जमा केलेले एकूण १७ लाख रुपये गेल्या वर्षापर्यंत त्यांना दिले. निवृत्तीनंतर सावंत ठाकुर्ली येथे राहण्यास गेले.
तपास सुरू
याप्रकरणी निवृत्त पोलिसाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू असल्याचे दादर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
पैसे देण्यास टाळाटाळ
- काही दिवसाने दादर भागात जाऊन पाहणी करताच, तेथे कुठलेही काम दिसून न आल्याने त्याच्याकडे पैसे परत करण्याचा तगादा सुरू केला.
- आज-उद्या पैसे देणार असल्याचे पटेलने सांगत टाळाटाळ सुरू केली. अखेर, पैसे मिळत नसल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली.
- याप्रकरणी दादर पोलिसांनी सावंतच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहेत. पटेल हे लोहमार्ग पुणे येथे श्वानपथक, खडकी येथे सध्या कार्यरत आहेत.