Join us  

'नव हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुलं फक्त मंत्र्यांसाठी, देव मात्र कोरडेच', शिंदे सरकारवर शिवसेनेचं टीकास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 8:13 AM

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार-फुलांच्या बंदीवरुन भक्त आणि फुल विक्रेत्यांनी संताप व्यक्त केलेला असताना यावादावर शिंदे सरकारला अजूनही ठोस तोडगा काढता आलेला नाही.

मुंबई-

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार-फुलांच्या बंदीवरुन भक्त आणि फुल विक्रेत्यांनी संताप व्यक्त केलेला असताना यावादावर शिंदे सरकारला अजूनही ठोस तोडगा काढता आलेला नाही. याच मुद्दयावरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून आज शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावण्यात आले आहेत. या राज्यात फुलं फक्त मंत्र्यांसाठी आहे. या नव हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात देव कोरडेच राहणार आहेत, अशी टीका शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. 

राज्यात सध्या हिंदुत्वाच्या नावाने बऱ्याच गमतीजमती सुरू आहेत व त्यावरुन देव आणि संतांच्या दरबारात राडे केले जात आहे. सर्वधर्मीय संत व श्रद्धेचे पीठ असलेल्या साईबाबांच्या शिर्डीतील हार, फुले, नारळ बंदी उठायला तयार नाही. भक्तींनी शिर्डीत हार, फुले, नारळ वगैरे न्यायचे नाहीत हा फतवा उठावायला महाराष्ट्रातील तोतया हिंदुत्वावाद्यांचे सरकार तयारी नाही, अशा शेलक्या शब्दांत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. 

'सामना'च्या अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

  • मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डेप्युटींसह 'अर्जंट' दिल्लीस जावे व शिर्डीतील हार-फुलांसंदर्भातील काय निर्णय घ्यावा यावर निकाल घेऊन यावे. तोपर्यंत साईबाबांनी भक्तांना शांत राहण्याची सुबुद्धी द्यावी. लोक भडकले, फुले पेटली तर संत साईबाबांवर ईडी आणि सीबीआय कारवाईचे आदेश दिले जातील. 
  • तेव्हा फुलांनो, कळ्यांनो, संतांनो शांत राहा! देवांनो गप्प बसा. फुले फक्त मंत्र्यांसाठी आहेत. या नव हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात देव कोरडेच राहणार आहेत.
  • मंदिर बंदीचा फतवा केंद्र सरकारचा होता. पण महाराष्ट्रातील भाजपावाले ठाकरे सरकारविरोधात घंटानाद आंदोलनं करत होते. मंदिरे उघडा म्हणून छाती पिटत होते. पण बाबांनो, सब कुठ बंदचा फतवा तुमच्याच मोदी सरकारचा होता ना
  • राज्यात कोरोना, स्वाईन फ्लू अमाप वाढत असला तरी मुख्यमंत्री व त्यांचे डेप्युटी साहेब गर्दीतल्या राजकीय हंड्या फोडत फिरत होते. आता सार्वजनिक गणेशोत्सव वगैरेही जोरात साजरे करा असे सांगितले गेले. ते चांगलेच झाले. म्हणजे संपूर्ण राज्यात कसली म्हणजे कसलीच बंदी नाही. मग फक्त शिर्डीतील साई दरबाबात हार, फुले, नारळ वगैरेंच्या बंदीचे कारण काय?
  • नव हिंदुत्वावादी शासनकर्ते गप्प आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकट्या शिर्डीतील हार-फुलांवरच रोष का? राज्यातील सगळाच शेतकरी श्रीमंत नाही. फुलशेती करणारे तसे गरीबच, पण सरकार गरीब फुलशेती करणाऱ्यांकडे ढुंकून पाहायला तयार नाही. 
  • साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिलाय हे खरे, पण घरातील चुलीच विझल्या, पोटाताली आगडोंब उसळला तर फुलांच्याही ज्वाला होतील. शिर्डीतील वातावरण सध्या हे सांगत आहे. 
टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे