मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था झाल्याची नेहमीच ओरडत असते. कुठे शाळेत विद्यार्थी नाहीत, कुठे शिक्षक नाहीत, कुठे शाळाच नाही, तर कुठे शाळेला जायला पावसाळ्यात रस्ताच नाही, अशा अनेक गंभीर समस्या आहेत. त्यातच, खासगी संस्थांचे वाढते बाजारीकरण आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला कल पाहाता जिल्हा परिषद शाळांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच, छत्रपती संभाजीराजेंनी सरकारी शाळांबद्दल अतिशय गंभीर विधान केलं आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून ते सध्या राज्यभर फिरत आहेत. त्यातून आलेले काही अनुभवही त्यांनी सांगितले.
संभाजीराजेंनी राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर टीका करताना सरकारी शाळांची झालेली दयनीय अवस्था याकडे लक्ष वेधले. खास रे चॅनेलच्या युट्यूबरला मुलाखत देताना संभाजीराजेंनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. गड किल्ले संवर्धनासह शिक्षणावरही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारला लक्ष्य केलं. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत दिलं. शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानात शिक्षणावर २१ टक्के खर्च केला जात होता. आज अमेरिका ही शिक्षणाची पंढरी असं समजलं तरी, ते शिक्षणावर ६ टक्केच खर्च करतात. आपल्या देशात तर खूप कमी करत असतील.
देशात जे सुरूय ते सगळं खासगी संस्थांमधूनच सुरू आहे, म्हणजे खासगी संस्थांचं जाळ उभा राहिलं म्हणून आपण आपलं मूळ सोडायचं का, आपल्या मूळ संस्था बंद करायच्या का, असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी केला. तसेच, आजही ग्रामीण भागात व्यवस्थीत रस्त्याच्या सोयी नाहीत, वाड्या-वस्त्यांवरुन गावात जायला फार अंतर असतं. म्हणून, तुमच्या गावात शाळा पाहिजेल. काही दिवसांपूर्वी मी बार्शीच्या एका गावात गेलो होतो, त्या गावात शाळेची परवानगी मिळालेली आहे, निधीही आला आहे. पण, तिथे शाळाच बांधली नाही. कारण, दोन गटांत वाद आहे, अशी शोकांतिकाही संभाजीराजेंनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारचे शिक्षण धोरण काय आहे?, काहीच नाही. सगळ्या जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत, मुलं इंग्लिश मीडियमध्ये जात आहेत. कारण, सरकारी शाळांत इन्फ्रास्ट्रक्चर नाही, नवसंशोधन नाही. एकंदरीत हे असंच चाललं तर पुढील १० वर्षात एकही सरकारी शाळा राहणार नाही, असे खंतही संभाजीराजेंनी यावेळी व्यक्त केली.