बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 07:17 AM2024-10-25T07:17:27+5:302024-10-25T07:18:41+5:30
सर्वच नेतेमंडळींसोबत त्यांचे सहकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आ. पराग अळवणी, आ. योगेश सागर यांच्यासह आठ उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज भरताना सर्वच उमेदवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. वरळीतून आदित्य ठाकरे यांनी वडील उद्धव ठाकरे, आई रश्मी ठाकरे आणि भाऊ तेजस यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. यावेळी लोअर परळ शिवसेना शाखेतून मिरवणूक काढण्यात आली. त्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहिर, सुनील शिंदे, अजय चौधरी, खा. अरविंद सावंत, आ. सुभाष देसाई सहभागी झाले होते.
मलबार हिलमधून भाजप नेते आ. मंगल प्रभात लोढा यांनीही गुरुवारी अर्ज दाखल केला. लोढा सातव्यांदा निवडणूक लढवत आहेत, तर मुलुंडमधून आ. मिहीर कोटेचा यांनी कोळी नृत्य, ढोल-ताशांच्या गजरात शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला. यावेळी माजी खा. किरीट सोमय्या यांनीही कोळी नृत्यावर ताल धरला. मनोज कोटक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कांदिवली पूर्वमधून भाजपचे अतुल भातखळकर यांनी अर्ज भरला. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत माजी खासदार गोपाळ शेट्टी सहभागी होते. कलिनामधून उद्धवसेनेचे संजय पोतनीस यांनी अर्ज भरला. वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळंबकर यांनी मिरवणुकीने अर्ज दाखल केला. यावेळी चित्रा वाघ आणि कार्यकर्ते हजर होते. मागाठणेमधून भाजपचे प्रकाश सुर्वे यांनी अर्ज भरला.
अंधेरी पश्चिममधून भाजपचे अमित साटम यांनी जुहू येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील निवडणूक कार्यालयात अर्ज सादर केला. विलेपार्लेमधून पराग अळवणी यांनीही शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यावेळी विधानपरिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, ॲड. उज्ज्वल निकम, शिंदेसेनेचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे करण श्रॉफ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.