मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हेंचा व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात डॉ. कोल्हे यांनी नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांची भूमिका साकारल्याने हा वैचारीक असमतेचा वाद निर्माण झाला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यावरुन, राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हेंचं समर्थन करत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी रामायणातील उदाहरण दिलंय.
राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना गांधींची हत्या करणाऱ्या गोडसे यांचे समर्थन करणारी भूमिका तुम्ही कशी करू शकता, असा सवाल त्यांना विचारला जाऊ लागला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे यांना पाठिंबा देण्यात आला असून, त्यांनी केलेल्या नथुराम गोडसे भूमिकेला आमचा विरोधा नाही, असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनीही या गोष्टीचा बाऊ करण्याची काय गरज, असा प्रतिसवाल केला आहे. तर, अमोल मिटकरी यांनी रामायणातील रावणाचं उदाहरण दिलंय.
काय म्हणाले जयंत पाटील
अमोल कोल्हे यांनी 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती. त्यानंतर, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना घरघरात पोहचविण्याचं कामही अमोल कोल्हे यांनी केलं आहे. शेवटी कलाकार म्हणून त्यांनी ही भूमिका पार पाडली आहे. आम्ही 2019 मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर, लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला, लोकांनी त्यांना स्विकारलं. लोकसभेतही अतिशय चांगलं काम ते करत आहेत, त्यांची भाषण आपण युट्यूबवर पाहू शकता. सभागृहात शाहू, फुले, आंबेडकरांचेच विचार त्यांनी मांडले आहेत. त्यामुळे, आजच्या त्यांच्या भूमिकेकडे बघण्याची आवश्यकता आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. पाटील यांनी एकप्रकारे त्यांच्या भूमिकेचं समर्थनच केलं आहे.