राज्यात कोसळधारा; धरणे ८० टक्के भरली: मुंबईत आज असे असेल हवामान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 06:01 AM2024-08-25T06:01:40+5:302024-08-25T06:02:07+5:30

आणखी दोन दिवस पावसाचा जोर राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

In the state Dams 80 percent full Weather will be like this in Mumbai today | राज्यात कोसळधारा; धरणे ८० टक्के भरली: मुंबईत आज असे असेल हवामान

राज्यात कोसळधारा; धरणे ८० टक्के भरली: मुंबईत आज असे असेल हवामान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काही दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाने शुक्रवारी रात्री आणि शनिवारी हजेरी लावत राज्यात ठिकठिकाणी बरसात केली. संपूर्ण कोकणसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशात पावसाचा जोर चांगला होता. धरणातील साठ्यांमध्ये वाढ झाली असून, धरणे ८०  टक्के भरली आहेत. शनिवारी उजनी, मुळा, गंगापूर धरणातून विसर्ग सोडण्यात आला. दरम्यान, आणखी दोन दिवस पावसाचा जोर राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

गेल्या २४ तासांत जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यात मुळधार पाऊस झाला. नाशिकच्या गंगापूर धरणातून ७४१३ क्यूसेक विसर्ग सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.  

मुंबईकरांना दिलासा
शनिवारी सकाळपासूनच मुंबईत सर्वदूर पावसाची हजेरी लागण्यास सुरुवात झाली. शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगला पाऊस पडला. विशेषत: सकाळपासून दाटून आलेल्या ढगांनी रात्री उशिरापर्यंत पावसाने मारा कायम ठेवला होता. रविवारीही मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने गारेगार झालेल्या मुंबईकरांचा रविवार कूल होणार आहे.

संभाजीनगरात बरसला
छत्रपती संभाजीनगर शहरात जूननंतर थेट शुक्रवारी रात्री आणि शनिवारी मोठ्या पावसाचा अनुभव शहरवासीयांनी घेतला. शहरात शनिवारी दुपारनंतर पावसाने चांगलीच हजेरी लावली. दिवसभरात २१.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.

मराठवाड्यातही धाे-धाे 
बीड जिल्ह्यात २४ तासांत ११ मंडळांत अतिवृष्टी झाली असून, पांगरीतील पर्यायी पूल वाहून गेला. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 
परभणी  जिल्ह्यात सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून, रस्त्यांना नाल्याचे स्वरूप  आले आहे. मुदगल बंधाऱ्यातून विसर्ग सोडण्यात आला आहे. 
नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पात ९६ टक्के जलसाठा, विष्णुपुरीचे एक, तर लिंबोटीचे तीन दरवाजे उघडले. धाराशिव जिल्ह्यात वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. 

राजापूर-काेल्हापूर मार्गात दरड काेसळली
- मुंबईसह ठाणे, कोकण, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. 
- पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणाऱ्या राजापूर-कोल्हापूर मार्गावरील अणुस्कुरा घाटात शनिवारी पहाटे ५च्या सुमारास दरड कोसळली असून, घाट रस्ता बंद झाला आहे.
- वीर धरणातून नीरा नदीमध्ये तर उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू आहे. हे धरण पूर्णपणे भरले आहे.

Web Title: In the state Dams 80 percent full Weather will be like this in Mumbai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.