अवकाळी पावसात मुलाचा अपघात; उपचारासाठी ६ लाख जमवण्यास धडपडतोय पोलीस हवालदार
By गौरी टेंबकर | Published: November 30, 2023 10:50 AM2023-11-30T10:50:59+5:302023-11-30T10:51:38+5:30
इंजिनिअरींगचे स्वप्न अडकले व्हेंटिलेटरमध्ये
गौरी टेंबकर
मुंबई: लोकल आर्म विभागात कार्यरत असलेले हवालदार राजू जाधव हे सध्या त्यांचा २५ वर्षांचा मुलगा सईल याच्या उपचारासाठी ६ लाख रुपये गोळा व्हावेत म्हणून धडपडत आहेत. मुंबईत ९ नोव्हेंबर रोजी अचानक आलेल्या पावसाने झालेल्या निसरड्या रस्त्यावर स्कुटीसह घसरून त्याचा भीषण अपघात झाला आणि इंजिनीयर होण्याचे स्वप्न पाहणार सईल गेल्या २० दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहे.
अंधेरी पूर्वमधील मरोळच्या लोकल आर्मस विभागात जाधव कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा ९ नोव्हेंबर रोजी त्याच्या आजीसाठी औषध खरेदी करायला निघाला आणि अनपेक्षितपणे पाऊस सुरू झाला. हेल्मेट घातलेला सईल निसरड्या रस्त्यावर आला, ज्यामुळे त्याची स्कूटी घसरली आणि दुभाजकावर आदळली. या अपघातात त्याच्या मेंदू, फुफ्फुस आणि मज्जातंतूला दुखापत झाली. त्याच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये विविध शस्त्रक्रिया आणि उपचार होऊनही १४ दिवसांत हा खर्च १९ लाख रुपयांवर पोहोचला. जाधव यांनी सुरवातीला दिड लाख रुपये भरले. तर त्यांचे सहकारी, बॅच मेट आणि निवृत्त पोलीस अधिकारी यांच्या योगदानाने ९.५० लाख रुपये जमा झाले आहेत. तरीही नानावटी हॉस्पीटल येथील वैद्यकीय बिलांची पुर्तता करण्यासाठी अतिरिक्त ६ लाख रुपयांची गरज आहे ज्यासाठी ते एनजीओ तसेच फंड जमा करणाऱ्या साइट्सवर मदत मागत आहेत.
ग्रीन सिग्नलमार्फत फोर्टिसमध्ये !
जाधव यांच्या मुलाला मुंबई पोलिसांनी आणीबाणीच्या ग्रीन सिग्नल अंतर्गत वाहतूक थांबवून नानावटी रुग्णालयामधून फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवले जे मोठे आव्हान होते. हे करण्यापूर्वी त्यांनी नानावटी रुग्णालयात एक ६ लाख रुपयांचा पोस्ट डेटेड चेक भरला होता.
पोलीस योजनेला, वयाची मर्यादा !
दुःखाची गोष्ट म्हणजे सईल याचे वय २५ वर्ष
आणि ८ महिने आहे. पोलीस
योजनेंतर्गत मिळणारे लाभ हे २५ वर्षापर्यंत असल्याने या पात्रतेच्या निकषात तो बसत नाही.
विशेष परवानगीसाठी प्रयत्न !
कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत अविवाहित आणि २५ वर्षापर्यंत पोलिसांच्या मुलांना मदत मिळू शकते. मात्र जाधव यांच्या मुलाचे वय पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसल्याने त्यासाठी मी शासनाशी पत्रव्यवहार करत त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा यासाठी प्रयत्न करत आहे.
(एस. जयकुमार - सहपोलीस आयुक्त, प्रशासन )