Join us

सुंदरीच्या मोहात तुमचेही खाते होऊ शकते रिकामे; ९ महिन्यांत सेक्सटॉर्शनचे ४६ गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 10:22 AM

सुंदरीचा फोटो ठेवून सोशल मीडियावरून रिक्वेस्ट पाठवायची. मधाळ संवादातून जाळ्यात ओढायचे.

मुंबई :

सुंदरीचा फोटो ठेवून सोशल मीडियावरून रिक्वेस्ट पाठवायची. मधाळ संवादातून जाळ्यात ओढायचे. मधाळ संवादातून अश्लील व्हिडीओ कॉल करून समोरच्यालाही तशाच स्थितीत येण्यास भाग पाडायचे. सावज जाळ्यात येताच याच व्हिडीओच्या आधारे, मॉर्फ केलेल्या फोटोच्या आधारे धमकावून खंडणीची मागणी केली जाते.  

पुढे याच फ़ोटोच्या आधारे सायबर पोलिस, सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली फसवणूक होते. गेल्या ९ महिन्यात सेक्सटॉर्शन प्रकरणी ४६ गुन्हे पोलिस दप्तरी नोंद झाले आहेत. याप्रकरणी ९ गुन्ह्यांची उकल करत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी  सप्टेंबर पर्यंत सायबर फसवणुकीचे ३ हजार १९१ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यात सेक्सटॉर्शनचे ४६ गुन्हे नोंद असून, ९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली.  १३ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही आमदारही या जाळ्यात अडकले होते.  

राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरयाणाच्या सीमावर्ती भागात अशा सायबर हनी ट्रॅप लावून पैसे उकळणाऱ्या अनेक टोळ्या तयार झालेल्या आहेत. या टोळ्यांमध्ये आठवी ते बारावी पास मुलांना घेतले जाते.  त्यांना हे गुन्हे करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार ही टोळी एखाद्या सुंदर तरुण मुलीच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळतात. 

 अशी घ्या काळजी  सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सची सेटिंग्ज प्रायव्हेट ठेवा. समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाऊंटपासून विशेष सावध राहा.   त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करू नका. विविध फ्रेंडशिप क्लबसाठी पैशांचे व्यवहार टाळा.   आपल्याला बदनामीची भीती घालून कोणी ब्लॅकमेल करत असेल तर, तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ठगीसाठी वीटभट्टीवरील कामगारांच्या नावे सिम कार्ड फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले सिम कार्ड पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या कारवाईत आरोपींनी ठगीसाठी वीटभट्टीवरील कामगारांच्या नावे सिम कार्ड केले आहे. 

१३ जणांवर अटकेची कारवाई ९ गुन्ह्यांची उकल४६ सेक्सटॉर्शनचे गुन्हे नोंद करण्यात आली.३,१९१ या वर्षी सप्टेंबर पर्यंत फसवणुकीचे गुन्हे 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी