मेट्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा; ठाण्यासह अख्ख्या मुंबईलाही जोडणार, लोकलवरील ताण होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:48 AM2023-03-27T10:48:42+5:302023-03-27T10:48:58+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रोच्या कारशेडचे काम ५४ टक्के पूर्ण झाले असतानाच आता दुसरीकडे मेट्रो २ ब च्या मंडाळे डेपोच्या का
मुंबई : डी. एन. नगर ते मानखुर्द - मंडाळे या २३.६४ किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्ग २ ब साठी मंडाळे येथील ३० हेक्टर जागेत मेट्रो कार डेपो उभारला जात असून, मंडाळे आगारातील २१ मीटर उंचीची सिम्युलेटर इमारत ही तीन मजली इमारत आहे. सिम्युलेटर बिल्डिंगचा वापर रिअल टाइम सिम्युलेशनद्वारे रोलिंग स्टॉक ड्रायव्हर्स / ऑपरेटर्सच्या प्रशिक्षणासाठी केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रोच्या कारशेडचे काम ५४ टक्के पूर्ण झाले असतानाच आता दुसरीकडे मेट्रो २ ब च्या मंडाळे डेपोच्या कामाचीही ६४ टक्के प्रगती झाली आहे.
या डेपाेच्या तळमजल्यावर एंट्रन्स लॉबी, सब सिस्टिम मेंटेनन्स सिम्युलेटर मॉड्यूल रूम, फुल स्कोप ट्रेन ड्रायव्हिंग सिम्युलेटर रूम, फुल स्कोप ट्रेन ड्रायव्हिंग सिम्युलेटर ऑब्झर्व्हेशन रूम, कॉम्प्युटिंग रूम, इलेक्ट्रिकल रूम यांचा समावेश आहे. प्रसाधनगृहे, पँट्री, लॉबी, सिम्युलेटर्स रूम, टेक्नॉलॉजी सेंटर, ई-लर्निंग सेंटर, ऑफिस स्पेस, पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष, क्रू कंट्रोल रूम, टॉयलेट आणि ओपन टेरेस यांनी ही इमारत सुसज्ज आहे.
मेट्रो २ ब कोणाला जोडणार ?
- कुर्ला रेल्वेस्थानकाशी जोडला जाईल.
- मानखुर्द रेल्वेस्थानकाशी हा मार्ग कनेक्ट असणार.
- मोनोरेलच्या चेंबूर स्थानकाला मेट्रोची कनेक्टिव्हिटी असेल.
- डी.एन. नगर येथे मेट्रो मार्ग १ सोबत मेट्रो २ ब हा मार्ग जोडला आहे.
- कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ मार्गाशी मेट्रो २ ब वांद्रे येथील जंक्शनवर जोडली जाईल.
- वडाळा ते ते कासारवडवली (ठाणे) दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ४ सोबत कुर्ला येथे मेट्रो २ ब जोडली जाईल.
टीमचे प्रशिक्षण
ड्रायव्हिंग सिम्युलेटर क्षेत्रामध्ये कोचचा संपूर्ण कॅब मॉकअप, मोशन प्लॅटफॉर्मवर एकत्रित केलेला आहे. २० प्रशिक्षणार्थी बसण्याची क्षमता असलेला निरीक्षक कक्ष आणि इलेक्ट्रॉनिक घटक जोडण्यासाठी एक तांत्रिक कक्ष आहे. हे रोलिंग स्टॉक क्रू आणि ऑपरेशन टीमचे प्रशिक्षण सुलभ करतील.
८ डब्यांचे ७२ रेक
डेपोमध्ये स्टेबलिंग यार्डच्या दोन स्तरांवर ८ डब्यांचे ७२ रेक बसविण्याची क्षमता असेल. डेपोमध्ये सर्व गाड्यांचे मोठे फेरबदल, सर्व किरकोळ वेळापत्रक आणि दुरुस्ती, अवजड उपकरणे बदलण्यासाठी लिफ्टिंग आणि चाचणी, अवजड उपकरणांची दुरुस्ती इत्यादी सुविधा असतील.
काम जोरात सुरू
रोलिंग स्टॉक सिम्युलेटर्स इमारत पूर्ण करून मैलाचा दगड गाठला आहे. मेट्रो पायलटच्या प्रशिक्षणासाठी कोचचा संपूर्ण कॅब मॉकअप स्थापित केला जाईल. ज्यामुळे वास्तविक परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य सुलभ होईल. आजपर्यंत मंडाळे डेपोची ६४ टक्के प्रगती झाली आहे. साइट एक्झिक्युशनचे काम जोरात सुरू आहे. - एस.व्ही.आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए