पहिल्याच पावसात नालेसफाईची झाली पोलखोल; वर्षा गायकवाड यांचा आरोप
By मनोहर कुंभेजकर | Published: June 25, 2023 04:52 PM2023-06-25T16:52:29+5:302023-06-25T16:52:45+5:30
सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण ? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
मुंबई- मुंबईत काल पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतुकीचा बोजवारा उडाला त्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागला. मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, घोटाळा आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई महानगर पालिका आयुक्त यांना आम्ही यापूर्वीच सांगितलं होते. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा वर्षा गायकवाड यांनी केला.
यामुळे महानगर पालिका आणि सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे पहिल्याच दिवशी फोल ठरलेले आहेत. धादांत खोटं बोलणारं हे शिंदे- फडणवीस सरकार आणि मनपा अधिकारी आहेत, असा आरोप त्यांनी केला. काल पहिल्याच पावसात मुंबईत अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, सायन, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचले होते. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली, त्यांचे प्रचंड हाल झाले. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण ? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.