Join us

महागाईच्या भडक्याला गॅसचे इंधन, मुंबईत CNG, PNG च्या दरात मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 1:00 PM

CNG and PNG Rate: देशातील महागाईचे रूप अधिकधिक भीषण होत चालले आहे. त्यात या महिन्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात काहीशी घट झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला होता.

मुंबई - देशातील महागाईचे रूप अधिकधिक भीषण होत चालले आहे. त्यात या महिन्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात काहीशी घट झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र या सवलतीचा लाभ लोकांना मिळण्यापूर्वीच कंपनीने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. महानगर  गॅस लिमिटेडने बुधवारी सीएनजीच्या दरात ७ रुपये प्रतिकिलो एवढी वाढ केली आहे. तर पीएनजीच्या दरात पाच रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे.  त्यामुळे सीएनजीची किंमत ६७ रुपये प्रतिकिलो तर पीएनजी ४१ रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटरच्या दराने विकला जात आहे. महागाईच्या दुहेरी धक्क्याने मुंबईतील लोकांसाठी आता रस्त्यावर वाहन चालवणे महागले आहे, त्याबरोबरच स्वयंपाकघरात जेवण बनवणेही महाग झाले आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात झालेल्या या मोठ्या प्रमाणातील वाढीबाबत महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की, एलएनजीच्या किमतींमध्ये दुपटीने वाढ झाल्याने आमच्यासाठी भाववाढ करणे आवश्यक बनले होते. सरकारने एक एप्रिल रोजी एलएनजीच्या किमतीत वाढ करताना ते २.९० रुपयांवरून ६ रुपयांपर्यंत वाढवले होते. दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून व्हॅटमध्ये १० टक्के कपात करण्यात आल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने १ एप्रिल रोजी सीएनजीच्या किमतीत ६ रुपये प्रति किलो एवढी घट केली होती. त्यामुळे मुंबईत सीएनजी ६१ रुपये प्रति किलो तर पीएनजी ३६ रुपये प्रति एससीएम दराने विकला जात होता.

टॅग्स :मुंबईमहागाई