मच्छिमारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी संस्थेचे चर्चेसाठी आवाहन
By मनोहर कुंभेजकर | Published: June 1, 2023 05:23 PM2023-06-01T17:23:08+5:302023-06-01T17:25:33+5:30
यासंदर्भात माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी लोकमतला दिली.
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :- शिवस्मारक, कोस्टल रोड, वाढवण बंदर, गुजरात येथील मुंदरा पोर्ट ह्या सर्व प्रकल्पामध्ये सामुद्रिक जैवविविधता सर्वेक्षण करणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियोनोग्राफी ( एनआयओ )या संस्थेकडून चुकीचा अहवाल सादर केल्यामुळे आज मच्छिमार समाज देशोधडीला लागण्याच्या उंभरठ्यावर येऊन राहिला आहे.त्यामुळे संस्थेच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीकडून आक्रमक भूमिका घेत सोमवार दि, १२ जून रोजी एनआयओच्या वर्सोवा-चार बंगल्या येथील कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अखिल महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिला होता.
मच्छिमार उद्रेक आंदोलनाची" गांभीर्यता लक्षात घेऊन या संस्थेकडून मच्छिमार कृती समितीला चर्चेसाठी बसण्याचे आवाहनात्मक पत्र देण्यात आले असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी लोकमतला दिली.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियोनोग्राफी (एनआयओ) संस्थेच्या विनंती पत्रात नमूद करण्यात आले आहे की, मच्छिमारांची दिशाभूल करण्याचे काम तृतीय पक्षांकडून होत आहे.सदर संस्था ही देशातील विश्वासू संस्था असून मच्छिमारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरासन करण्यासाठी संयुक्त चर्चेच्या अनुषंगाने निर्माण झालेले गैरसमज सोडविण्याची विनंती करण्यात आली आहे. विंनती पत्रात या संस्थेकडून असेही नमूद करण्यात आले आहे की, मच्छिमारांनी जर आंदोलन मागे घेतले नाही तर एनआयओ आणि मच्छिमारांचे संबंध बिघडण्याची हुलकावणी देण्यात आली आहे.
मच्छिमार समिती रचनात्मक युक्तिवादात विश्वास ठेवत असून या संस्थेने आता पर्यंत बनविलेल्या सर्व पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवालातील सर्व त्रुटी आणि चुकीच्या माहिती पुराव्यानिशी सादर करण्यासाठी आणि या संस्थेच्या शास्त्रज्ञांबरोबर युक्तिवाद करण्यासाठी मच्छिमारांनी दि, ५ किंवा दि, ६ जून रोजी चर्चेला बसण्याची तयारी दर्शविली आहे असल्याची माहिती कोळी यांनी दिली.