मुंबई: पश्चिम उपनगरात सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी एस.व्ही.रोड येथे मेट्रोचे काम आणि डंपर वाहतुकीमुळे रस्ते आणि अंतर्गत रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर, दवाखाने येथे जाताना नागरिक त्यांची वाहने पार्क करू शकत नाहीत.पहाटेपासून अवजड डंपर वाहतूक सुरू असल्याने दररोज २-३ अपघात होतात. या मुंबई आणि एमएमआरडीए क्षेत्राच्या जटिल समस्येसाठी आपण संवेदनशील होवून जातीने लक्ष द्यावे अशी मागणी राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी एमएमआरडीए आयुक्त एस.आर.व्ही.श्रीनिवासन यांना केली आहे.सदर माहिती आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा दिल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम उपनगरात ठिकठिकाणी रस्ते खोदले असल्याने जेव्हीपीडी स्किम,कूपर हॉस्पिटल, क्रिटिकेअर हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, पिनॅकल इमेजिंग सेंटर, अनिदीप नेत्र रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल आणि इतर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिका पार्किंगसाठी जागाच नाही. ही वस्तुस्थिती डॉ.दीपक सावंत यांनी त्यांच्या निदर्शनास आणली.
येथील अवजड वाहतूक आणि डंपर यामुळे रस्ते पूर्णपणे खचले आहेत. आजच्या काळात तुमच्या खडबडीत आणि कोंदट रस्त्यावर कोणताही रुग्ण त्यांची मान, मणका धरू शकत नाही. मणक्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाने रस्त्यावर कसे जगावे? रुग्णाला उपचार आणि रुग्णालयात कसे दाखल करता येईल असा सवाल त्यांनी श्रीनिवासन यांना केला.
आपण सदर सद्यस्थितीची माहिती एस.आर.व्ही.श्रीनिवासन यांना वॉट्स अप कळवली असता,त्यांनी याप्रकरणी विशेष करून हॉस्पिटल परिसरातील समस्येकडे लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याची माहिती डॉ.दीपक सावंत यांनी दिली.