राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस. राष्ट्रीय नेते म्हणून शरद पवार यांची महाराष्ट्राला आणि देशाला ओळख आहे. त्यामुळे, त्यांचा वाढदिवस देशपातळीवर विविध ठिकाणी साजरा केला जातो. महाराष्ट्रात आजच्या दिवशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. अर्थात, पवार कुटुंबीयांकडूनही हा वाढदिवस साजरा केला जात असतो. मात्र, यंदा शरद पवार नागपुरात असून त्यांची कन्या व खासदार सुप्रिया दिल्लीत आहेत. त्यामुळे, राजधानी दिल्लीतूनच त्यांनी वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी, व्हिडिओ कॉलवरुन त्यांनी शरद पवारांशी संवाद साधला.
यंदा महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर पुरेसा पाऊस-पाणीही नाही. त्यामुळे, शरद पवारांनी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे. मात्र, देशभरातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. शरद पवार आज नागपुरातील युवा संघर्ष यात्रेच्या महासभेला उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी काल ते चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी भूमिका मांडत होते. खासदार सुप्रिया सुळेंनी तोच जनहिताचा धागा पकडून वडिलांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
''कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे. मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. खासदार सुळेंनी दिल्लीवरुन व्हिडिओ कॉल करुन वडिल शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरवरुन व्हिडिओ कॉलचा फोटो शेअर करत भावनिक आणि संघर्षमय संदेशही लिहिला आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे, त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे !!, असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. अखेर, बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !, असेही त्यांनी लिहिले.