मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकावर वाहतूक पोलिस कडक कारवाई करणार आहेत. त्यामुळे, मुंबईकरांनी नियमांचे पालन करीत नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हालाही नववर्षाचे स्वागत पोलिस कोठडीत करायचे नसल्यास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.रॅश ड्रायव्हिंगचे प्रकार होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी अशा घटना होणारी ठिकाणे शोधून बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.
थर्टी फर्स्ट निमित्ताने पोलिस रस्त्यावर :
थर्टी फर्स्ट निमित्ताने हजारो पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर तैनात असणार आहे. पोलिस उपायुक्त, अप्पर पोलिस आयुक्त, पोलिस अधिकारी, तसेच अंमलदार, तसेच एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी टीम बंदोबस्तासाठी सज्ज राहणार आहेत.
थेट पोलिस कोठडी :
दारू पिऊन गाडी चालविल्यास थेट कोठडीची हवा खावी लागणार असल्याचाही इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे पोलिस कारवाई नको असल्यास कोणीही नियमांचे उल्लंघन करू नका, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पार्टी करून गाडी चालवू नका :
त्या रात्री दारू पिऊन वाहन चालविल्याने अपघाताच्या घटना घडू नयेत याची खबरदारी वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. त्यानुसार, बंदोबस्त तैनात करीत पोलिस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे.
ड्रग्ज तस्करांवरही विशेष लक्ष...
थर्टी फर्स्ट नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थाच्या विक्रीची ठिकाणे, कोडवर्ड आणि रेव पार्ट्यांची माहिती घेण्यासाठी फेसबुक, ट्विटर, वॉट्स ॲप आणि ईव्हेन्ट ऑर्गनायझर कंपन्यांच्या साईटसह अन्य सोशल नेटवर्किंग साईट व पंचतारांकित हॉटेल, रेस्टॉरंट आणि पब यांच्या ऑनलाईन बुकिंग साईटवर गुन्हे शाखेची नजर आहे.
काही इव्हेंट कंपन्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ॲपचा वापर करून अशा पार्ट्यांचे आयोजन करतात. मुंबईमध्ये अंमली पदार्थांची तस्करी होते. अंमली पदार्थांची तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी तस्करांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.