संकटाच्या काळात फक्त इथे क्लिक करा! पालिकेचे ॲप येणार मदतीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 12:28 PM2023-06-11T12:28:19+5:302023-06-11T12:28:31+5:30
मुंबईतील पावसाळा म्हणजे कधी कुठे काय घडेल याचा नेम नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील पावसाळा म्हणजे कधी कुठे काय घडेल याचा नेम नाही, त्यामुळे किमान ज्या घटनांबद्दल पूर्वसूचना किंवा माहिती मुंबईकरांना मिळू शकते ती मिळावी यासाठी पालिकेमार्फत ‘डिझास्टर मॅनेजमेंट बीएमसी’ नावाचे ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ॲप्लिकेशन ‘प्ले स्टोअर’च्या माध्यमातून डाऊनलोड करता येईल.
ॲन्ड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रकारच्या प्रणालींकरिता या ॲपची सुविधा असेल. त्यामुळे आपत्कालीनप्रसंगी कुठे संपर्क करावा? कसा साधावा ? त्यावेळची भौगोलिक परिस्थिती काय आहे या सगळ्या बाबतची माहिती मुंबईकरांना एका क्लिकवर मिळणार आहे.
ॲपमुळे मुंबई शहर व उपनगरात होत असलेल्या पावसाचा दर १५ मिनिटांचा, दर तासाचा तसेच दर २४ तासांचा अद्ययावत अहवाल मिळणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणांनुसार तिथे पडलेल्या पावसाची माहितीही तत्काळ व सहजपणे बघता येऊ शकेल. हवामान पर्यायांमध्ये वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील दमटपणाचे प्रमाण, पर्जन्यमापनाची तीव्रता या बाबीही अंतर्भूत आहेत. ज्या नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड केले असेल अशा नागरिकांना समुद्रास ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांची वेळ व उंची तसेच वेधशाळेमार्फत जोरदार, अतिजोरदार, मुसळधार पावसाच्या अंदाजाची माहिती नोटीफिकेशनद्वारे प्राप्त होणार आहे.
पालिका नियंत्रण कक्षांची माहिती मिळणार
या ॲपवर इमर्जन्सी बटनाची आणखी एका सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या बटनावर क्लिक केल्यास ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या ५०० मीटर परिसरातील रुग्णालये, अग्निशमन केंद्र, पोलिस ठाणे तसेच महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक तत्काळ मिळणार आहेत. शिवाय या ॲपवर असणाऱ्या सेफ्टी टिप्स या सुविधेअंतर्गत २० वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींच्या अनुषंगाने काय करावे व काय करू नये याबद्दल अत्यंत माहितीपूर्ण अशा २० ॲनिमेटेड फिल्म उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वेधशाळेची लिंक उपलब्ध
या मोबाइल ॲपवर भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा व अंधेरीस्थित दोन्ही डॉपलर रडारवरील ढगांची सद्य:स्थिती, उपग्रह प्रतिमांचे (सॅटेलाइट इमेजेस) निरीक्षण करावयाचे असल्यास त्याकरिता थेट कुलाबा वेधशाळेशी जोडणारी लिंक आहे. रस्ते वाहतुकीसोबत लोकल वाहतूक विलंबाने होत असल्यास त्याबाबतची रेल्वे नियंत्रण कक्षाकडून प्राप्त अद्ययावत माहितीदेखील या ॲपवर असेल. विमानसेवेवर काही परिणाम झाला असल्यास त्याची माहितीही मिळेल.
धोकादायक इमारती, दरडीचीही माहिती
आपल्या विभागातील पाणी साचण्याची ठिकाणे, संभाव्य दरडी कोसळण्याची ठिकाणे, मोडकळीस आलेल्या इमारती याबाबतच्या माहितीसोबतच तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेल्या पालिकेच्या शाळा, विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत नागरिकांनी काय करावे व काय करू नये याची माहिती देण्यात आली आहे.