दोन महिन्यांत गोवराचे ८४ रुग्ण, तर तिघांचा मृत्यू; २०२२ मध्ये सर्वाधिक संसर्ग

By संतोष आंधळे | Published: November 12, 2022 08:49 AM2022-11-12T08:49:17+5:302022-11-12T08:49:24+5:30

कोरोना महासाथीचा धक्का सहजपणे पचविणाऱ्या मुंबई महानगरामध्ये गोवर या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

In two months 84 cases of measles and three deaths Highest number of infections in 2022 | दोन महिन्यांत गोवराचे ८४ रुग्ण, तर तिघांचा मृत्यू; २०२२ मध्ये सर्वाधिक संसर्ग

दोन महिन्यांत गोवराचे ८४ रुग्ण, तर तिघांचा मृत्यू; २०२२ मध्ये सर्वाधिक संसर्ग

Next

मुंबई :

कोरोना महासाथीचा धक्का सहजपणे पचविणाऱ्या मुंबई महानगरामध्ये गोवर या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्याच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा शहरात आहेत तसेच आर्थिकदृष्ट्या मुंबई महापालिका भक्कम आहे. असे असतानाही गोवरचा शिरकाव झाला. केवळ लसीकरणाच्या माध्यमातूनच गोवर आटोक्यात येतो. ही लस गेल्या पाच दशकांपासून उपलब्ध आहे. परंतु लस घेण्यासाठी मुलांना आरोग्य केंद्रापर्यंत आणावे लागते किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना घरोघरी जावे लागते. महापालिका रुग्णालयांत ही लस मोफत दिली जाते. तरीही गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात का आढळले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

कोरोनाकाळात अनेक मुले लसीकरणापासून वंचित राहिली, असा युक्तिवाद बालरोगतज्ज्ञांकडून केला जात आहे. परंतु कोरोनाकाळात महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे काम सगळ्यांनीच पाहिले. जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याची दखल घेतली. असे असताना आता आरोग्य यंत्रणांसमोर गोवरसाथीला आळा घालण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या दोन महिन्यांत गोवरचे ८४ रुग्ण आढळून आले आहेत, तर तिघांचा मृत्यू झाला. त्यातील एकाचा गोवरने मृत्यू झाल्याचा संशय आहे. उर्वरितांना गोवरसदृश लक्षणे होती. 

२०२२ मध्ये सर्वाधिक संसर्ग
गेल्या तीन वर्षांत मुंबईतील गोवर आजाराचा संसर्ग झाल्याची आकडेवारी लक्षात घेतली तर २०२२ या चालू वर्षात सर्वात अधिक गोवरचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. २०१९मध्ये ३७, २०२०मध्ये २९, २०२१मध्ये दहा बालरुग्ण आढळले होते. यंदा थेट १०९ बालकांना या आजाराचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. वर्षअखेरपर्यंत हा आकडा वाढण्याची भीती आहे. गेल्या दोन महिन्यांत झालेली रुग्णवाढ लक्षणीय आहे. गोवरचे सर्वात अधिक रुग्ण हे दाटीवाटीने उभारलेल्या वस्त्यांत तसेच झोपडपट्टी परिसरात प्रकर्षाने आढळून आले आहेत. 

तज्ज्ञ म्हणतात...
- गोवरप्रतिबंधक लसीची उपयुक्तता गेल्या ५० वर्षांपासून ज्ञात आहे. मात्र, अजूनही काहींपर्यंत ही लस पोहोचलेली नाही. महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई महापालिकेचे सर्वेक्षण वर्षभर सुरू असते. 
-  त्याचप्रमाणे गोवर, रुबेला, गालगुंड या आजारांवरील लस घ्यावी, यासाठी मोठी जनजागृती सुरूच असते. मात्र, काही पालकांकडून लस घेण्याकरिता कधी - कधी  नकार दिला जातो. त्यामुळे परिस्थिती अवघड होऊन जाते. 
- गेली अनेक वर्षे गोवंडी परिसरात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांनी नागरिक लस घेत नसल्याचा  दावा खोडून काढला. त्यांच्या मते, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द या भागाकडे पाहण्याचा आरोग्य विभागाचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण आरोग्याच्या सुविधा येथे पोहचताना मोठ्या अडचणी जाणवतात. 
- आरोग्य विभागाला वाटत असेल तर आम्ही लोकांमध्ये त्यांच्यासोबत जायला तयार आहोत. कारण महापालिकेचा आणि आमचा दोघांचा हेतू या वस्त्यांमधील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात असाच आहे, असे मत शेख नोंदवतात.

अजूनही समाजातील काही घटकांत गोवरबद्दल गैरसमज आहेत. त्यांना हा देवीचा आजार वाटतो. उपचारांऐवजी लिंबाची पाने पाण्यात टाकून आंघोळ घालणे वगैरे गोष्टी ते करत बसतात. त्यामुळे लसीकरणाकडे त्यांचा फारसा कल नसतो. मात्र, परिस्थिती सुधारत आहे. शासनातर्फे ही लस मोफत दिली जाते. त्याचे योग्य नियोजन करून प्रत्येकाच्या घरात जाऊन बारकाईने सर्वेक्षण केले तर गोवर निर्मूलनाची लढाई नक्की जिंकू शकतो. 
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष (महाराष्ट्र) इंडियन मेडिकल असोसिएशन.

Web Title: In two months 84 cases of measles and three deaths Highest number of infections in 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई