Join us

१७ हजार नवमतदारांचा पहिला कौल कोणाला ? २४ एप्रिलपर्यंत नावनोंदणी करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 10:32 AM

देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण रंगू लागले आहे. अशात जनरेशन अल्फा किंवा जनरेशन झेड नावाने ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीला विशेष महत्त्व आहे.

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण रंगू लागले आहे. अशात जनरेशन अल्फा किंवा जनरेशन झेड नावाने ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीला विशेष महत्त्व आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या १७ हजार ६३१ आहे. एकूण संख्येपैकी नवमतदार केवळ ०.९९ टक्के  आहेत. त्यामुळे अधिकाधिक नावनोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने २४ एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे. 

१८ ते २५ हा वयोगट लोकसंख्येतला सर्वाधिक सक्रिय वयोगट मानला जातो. कुमार वय ओलांडून तारुण्यात प्रवेश केलेल्या या वयोगटाची स्वप्ने मोठी असतात. बऱ्याचदा  घडणाऱ्या राजकारणातील घडामोडी, त्यातील निर्णय याचा त्यांच्या भविष्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे कोण निवडून येईल? कोणाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता द्यायला हवी याचा निर्णय ते अधिक योग्य पद्धतीने घेऊ शकतात. त्यामुळे नवमतदारांचे मतदान हे लोकशाहीला भक्ती देत असते. 

कोठे कराल ऑनलाइन नोंदणी?

१)  १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी ऑनलाइन पद्धतीने अथवा ऑफलाइन पद्धतीनेही नाव नोंदविता येणार आहे. 

२)   भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर तसेच वोटर हेल्पलाइन मोबाइल ॲपद्वारेही नोंदणी करता येणार आहे. 

मतदारांची कमी होणारी नावनोंदणी आणि त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत होणारी घट हे चिंतेचे कारण ठरत असल्याने निवडणूक आयोगाने यात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

अठरा वर्षे पूर्ण केलेल्या युवकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन लोकशाही बळकटीकरणाच्या या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४