Join us

बस सुरू करण्यास शालेय बस चालकांची असमर्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोनामुळे शाळा बंद होती, ऑनलाइन क्लासेस सुरू होते. त्यामुळे वर्षाहून अधिक काळ शालेय बस उभ्या होत्या. त्यांच्यात ...

मुंबई : कोरोनामुळे शाळा बंद होती, ऑनलाइन क्लासेस सुरू होते. त्यामुळे वर्षाहून अधिक काळ शालेय बस उभ्या होत्या. त्यांच्यात बिघाड झाला आहे, चालक, वाहकांचा तुटवडा आहे. त्यामुळे आता ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार असल्या तरी सुरू करणे अशक्य आहे, असे मत स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी व्यक्त केले.

अनिल गर्ग म्हणाले की, राज्यात ४० हजार शालेय बस आणि ७० हजार शालेय व्हॅन आहेत. कोरोनामुळे बसमालक आर्थिक संकटात सापडले आहेत. शाळा सुरू होणार आहेत; पण चालक, क्लीनर, महिला सहायक, व्यवस्थापक नाही. कोरोनामुळे बसचालकांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांना आठ ते दहा गाड्या आहेत; पण त्या उभ्या आहेत.

कोट्यवधीच्या गाड्या असूनही बसचालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरे पर्याय शोधावे लागले आहेत. काही बस मालक गाड्या धुणे, भाजीपाला विकणे, एखाद्या गाडीवर चालक म्हणून काम करणे आदी कामे करीत आहेत. बस चालक बस सुरू करण्याच्या स्थितीत नाहीत, तसेच प्रत्येक बसला दोन लाखांचा दुरुस्ती खर्च आहे. बस चालवण्यासाठी सक्षम नाहीत, त्यांचा विमा नाही, बॅटरी नाही, टायर चांगले नाहीत, त्यामुळे आम्ही बस कशा चालवायच्या, गेल्या महिन्यात आम्ही नियमावली देण्याची मागणी केली होती. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असेही ते म्हणाले.