Join us

प्राधिकरणाचा नाकर्तेपणा, महामार्गावरील खड्डे बुजवण्याची वाहतूक पोलिसांवर पाळी

By धीरज परब | Published: September 08, 2022 10:00 PM

एकीकडे महामार्गावर होणारे अपघात चिंतेचा विषय बनला असताना येथे मात्र महामार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे

मीरारोड - केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाकर्तेपणामुळे वरसावे पूल व महामार्गावरील मोठं मोठे खड्डे बुजवण्याची पाळी काशीमीरा वाहतूक पोलिसांवर आली आहे. मीरा भाईंदर हद्दीतून मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जातो. खाडी वरील वरसावे पूल व त्या नंतर वसईच्या दिशेने पुढे हा महामार्ग जात असून त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी हि केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक विभागा अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. 

एकीकडे महामार्गावर होणारे अपघात चिंतेचा विषय बनला असताना येथे मात्र महामार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वरसावे पुलावर तसेच काशीमीरा हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयां मुळे वाहन चालवणे जिकरीचे आणि तितकेच जोखमीचे बनले आहे. वाहन चालवताना अचानक येणाऱ्या खड्डयां मुळे अपघाताचा धोका वाढला आहे. एकीकडे भरमसाठ टोल वसुलायचा आणि महामार्ग मात्र खड्ड्यात असताना दुरुस्ती करायची नाही असा प्रकार असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. 

फाउंटन हॉटेल नाक्या वर सुद्धा खड्ड्यांचे साम्राज्य आहे. जेणे करून वाहतुकीची कोंडी सुद्धा वाढत आहे. महिन्या भरापूर्वीच घोडबंदर महामार्गावर खड्ड्यामुळे दुचाकी स्वाराचा बळी गेला होता. घोडबंदर रस्ता देखभाल दुरुस्ती राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग आणि वरसावे पुलावर पडलेले खड्डे महामार्ग प्राधिकरणाने सातत्याने सांगून देखील बुजवले नसल्याने अखेर अनंत चतुर्दशी आधी सदर खड्डे बुजवण्याचे काम वाहतूक पोलिसांनीच सुरु केले आहे . वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मंगेश कडसह दीपक भोसले, रवींद्र सावंत , रोहिदास राठोड आदी वाहतूक पोलिसांनी त्यासाठी सिमेंट मिश्रित खडी गोण्यां मधून रिक्षा वा लहान टेम्पो द्वारे आणून खड्डे बुजवण्याचे गुरुवारी पहाटे पासून सुरु केले . 

या आधी सुद्धा वाहतूक नियोजनाचे काम सोडून वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग व घोडबंदर मार्गावरील खड्डे बुजवण्याची कामे यंदाच्या पावसाळ्यात केली आहेत . तर प्राधिकरणाच्या बेजबादार अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदारांवर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.  

टॅग्स :मीरा रोडवाहतूक पोलीसमहामार्ग