‘विनोदवृत्तीच्या कमतरतेमुळे असहनशीलता वाढत आहे’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 05:22 AM2018-09-18T05:22:31+5:302018-09-18T05:22:46+5:30
काही ‘अतिसंवेदनशील’ लोक राजकीय फायद्यासाठी व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी क्षुल्लक गोष्टींचे अवडंबर माजवतात, असे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने काही दिवसांपूर्वी नोंदविले.
मुंबई : लोकांनी धर्माविषयी अतिसंवेदनशील होणे थांबवावे. समाजात आस्तिकांबरोबरच नास्तिकही राहतात, याचा स्वीकार लोकांनी केला पाहिजे. मुळात विनोदवृत्तीची कमतरता असल्याने असहनशीलता वाढत आहे. काही ‘अतिसंवेदनशील’ लोक राजकीय फायद्यासाठी व समाजात तेढ निर्माण करण्यासाठी क्षुल्लक गोष्टींचे अवडंबर माजवतात, असे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने काही दिवसांपूर्वी नोंदविले.
अशोक देशमुख व त्याच्या चार मित्रांवर हिंदू धर्माचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. अशोक देशमुख याने परशुराम यांची तुलना मराठी सुपरहिट चित्रपट सैराटमधील ‘परश्या’शी केली व त्याच्या मित्रांनी संबंधित फेसबुक पोस्टला लिंक केल्याने व कमेंट केल्याने त्याच्या चार मित्रांवरही गुन्हा नोंदविण्यात आला. तो रद्द करावा, यासाठी या सर्वांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या अर्जावरील सुनावणी न्या. तानाजी नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठापुढे होती. गुन्हा रद्द करताना न्यायालयाने म्हटले की, तक्रारदाराने ती पोस्ट विनोद म्हणून घ्यायला हवी होती. विनोदवृत्तीचा अभाव असल्याने भारतीयांची सहनशीलतेची मर्यादा कमी झाली आहे.
‘या गोष्टींतून राजकीय फायदा मिळवणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे किंवा जे अतिसंवेदनशील आहेत ते अशा पोस्ट अतिशय गांभीर्याने घेतात, अशा लोकांनी समाजात समस्या निर्माण केल्या आहेत,’ अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.
नास्तिक असल्याचे देशमुख याने बचावात म्हटले. ‘ही एक प्रबोधन चळवळ’ आहे. ज्यायोगे देशात उल्लेखनीय बौद्धिक विकास आणि बदल घडले. १९व्या शतकापासून पारंपरिक परंपरांवरील (अंधश्रद्धा) विश्वास नाकारण्याचा कल विकसित झाला. तेव्हापासून धार्मिक व ईश्वर न मानणाऱ्यांत वाद व्हायला लागला,’ असे न्यायालयाने म्हटले.
एखाद्या अंधश्रद्धेमागील तर्क विचारला गेला म्हणून एखाद्यावर खटला चालवला तर मानवाचा विकास होणार नाही. त्यामुळे सध्या हातात असलेल्या या प्रकरणासारख्या अन्य प्रकरणांवरील सुनावणी घेताना न्यायालयाने सावधानता बाळगणे आवश्यक आहे. ‘तर्कसंगत यंत्रणे’पासून कोणीही पळू शकत नाही. कारण हीच यंत्रणा अनेक महत्त्वाच्या सामाजिक समस्यांवेळी काळाच्या कसोटीवर खरी उतरली आहे. आपण मध्ययुगात परत जाऊ शकत नाही, याचे भान असणे आवश्यक आहे. अनेकांना धार्मिक गोष्टींत रस असू शकतो. मात्र, काहींना त्यात रस नसेल. लोकशाहीमध्ये अशा सर्वांना एकत्र राहावे लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही,’ असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.