Join us

आरोग्य, डम्पिंगच्या समस्येचा डोंगर; मूलभूत सुविधांसाठी नागरिकांवर झगडण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 10:05 AM

मुलुंडपासून मानखुर्द-शिवाजीनगरपर्यंत पसरलेल्या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मनीषा म्हात्रे, मुंबई : मुलुंडपासून मानखुर्द-शिवाजीनगरपर्यंत पसरलेल्या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, मुलुंडमधील नागरिकांची डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीतून सुटका झाली असली तरी कांजूरमार्ग आणि विक्रोळीतील नागरिकांचा लढा संपलेला नाही.

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात १६ -

लाखांहून अधिक मतदार आहेत. डोंगराळ वस्ती, रस्ते, पाणी, शौचालये अशा मूलभूत सोयीसुविधांसाठी नागरिकांना आजही झगडावे लागत आहे. पाण्यासाठी कळशी, हांडे घेऊन मोर्चे काढावे लागत आहेत. डोंगराळ भागात रस्ते व्यवस्थित नसल्याने आबालवृद्ध, गर्भवती महिला, रुग्ण यांना उपचारांसाठी रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाढती नशेखोरी आणि गुंडगिरी संपविण्याचे आव्हानही या मतदारसंघात आहे.

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय सोडल्यास पालिकेच्या रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव आहे. मुलुंडमध्ये पालिकेचे अगरवाल, वीर सावरकर आणि विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालय आहे. या मतदारसंघात सुपर स्पेशालिटी, मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांचे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी रुग्णांना आरोग्य सेवेसाठी खासगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागत आहे. तसेच संथगतीने सुरू असलेल्या विकासकामांबरोबर पुनर्विकासाचेच घोंगडे वर्षानुवर्षे भिजत पडलेले आहे.

मुलुंड पूर्वेला पाच हजार लोकवस्ती असलेल्या हरिओमनगरलगतच डम्पिंग ग्राउंड होते. त्याविरोधात तेथील नागरिकांनी केलेली आंदोलने, पाठपुराव्यानंतर हे डम्पिंग कांजूरमार्ग येथे हलवण्यात आले. त्यामुळे मुलुंडमधील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असला, तरी कांजूरमार्ग, विक्रोळी येथील नागरिकांचा डम्पिंगविरोधातील लढा सुरूच आहे. निवडणुकीत हा मुद्दाही गाजण्याची शक्यता आहे. अन्यथा बहिष्कार...मुलुंड पूर्व येथे सुरू असलेल्या प्रकल्पबाधितांच्या वसाहतींच्या बांधकामाला नागरिकांचा विरोध असून, त्याविरोधात आंदोलन सुरू आहे. येथील प्रश्न मार्गी न लावल्यास निवडणुकीवर बहिष्काराचा इशाराही देण्यात येत आहे.

कोकणात जाणाऱ्या गाड्यांना भांडुपला थांबा द्या!

भांडुपमधील बहुतांश रहिवासी कोकणातील आहेत. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना भाडूंप रेल्वेस्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांकडून ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अद्याप ते पूर्ण झालेले नाही.

मैदानाची वानवा...

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात क्रीडांगणाचाही अभाव आहे. त्यामुळे खेळाडूंना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

खासदारांचे रिपोर्ट कार्ड काय सांगते?

खासदार मनोज कोटक यांच्या रिपोर्ट कार्डनुसार, त्यांनी मतदारसंघात सार्वजनिक सेवा, शिक्षण, क्रीडा आणि कुटुंब कल्याण योजनांसह विविध कामांवर २५.२८ कोटींचा खर्च केला. दिलेल्या ५२७ आश्वासनांपैकी ३१९ कामे पूर्ण केली आहेत. लोकसभेत ९८ टक्के उपस्थिती लावत ३६७ प्रश्न विचारले आहेत. तसेच, ५३ चर्चासत्रांमध्ये भाग घेतला आहे

टॅग्स :मुंबईईशान्य भारतकचरा