खारदांड्यात अपुरा पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2016 05:04 AM2016-08-18T05:04:54+5:302016-08-18T05:04:54+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत पुरेसा पाणीसाठा असूनही आजही शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांना उपलब्ध
मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत पुरेसा पाणीसाठा असूनही आजही शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांना उपलब्ध पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत असून, काही ठिकाणी तर पाणी विकत घ्यावे लागत आहे. खार पश्चिमेकडेही काहीशी अशीच अवस्था असून, गेल्या तीन महिन्यांपासून येथील रहिवाशांना पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. परिणामी संबंधितांना पाणी विकत घ्यावे लागत असून, स्थानिक नगरसेविकेसह महापालिकेने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.
खार पश्चिमेकडील खारदांडा पाडा आणि चावकुठे चाळ येथे सुमारे एक हजार घरे असून वीस ते पंचवीस हजार लोक वास्तव्य करत आहेत. मागील तीन महिन्यांपासून अपुरा पुरवठा होत आहे. स्थानिकांना गझदरबंधमधून पाणी भरावे लागते असून विहिरीचाही आधार घ्यावा लागत आहे. तसेच एका हंड्यासाठी दोन तर एका गॅलनला पाच रुपये मोजावे लागत आहेत. (प्रतिनिधी)
नगरसेविकेचे दुर्लक्ष
खारदांडा पाडा आणि चावकुठे चाळीचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून स्थानिकांनी महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र महापालिकेकडून संबंधितांना काहीच उत्तर देण्यात आलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सुनीता वावेकर यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.