मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील जे जे समूह रुग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध रुग्णालयांतील नवीन विभाग आणि विकास कामांचे उद्घाटन करण्याचा निर्णय विभागातर्फे घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने उद्घाटनासाठी मंत्र्याच्या तारखा घेण्याचे काम सध्या सुरू आहे.
जे जे समूह रुग्णालयाच्या अंतर्गत जी टी, सेंट जॉर्जेस आणि कामा रुग्णालयाचा समावेश येतो. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णांसाठी नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे कामा रुग्णालयात आयव्हीएफ (वंध्यत्वावर उपचार) क्लिनिक या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांत तरुण जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढले असून, अनेक जोडपी वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आयव्हीएफ क्लिनिकमध्ये जाऊन उपचार घेत आहेत. मात्र खासगी रुग्णालयात या आजारावरील उपचार महाग असल्याने ते गरिबांना परवडत नाही. त्यामुळे शासनाने या आजारावरील उपचारांचे क्लिनिक कामा रुग्णालयात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गरिबांना वंध्यत्वावरील उपचार घेणे शक्य होणार आहे. सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिव्हर (यकृत) क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. या क्लिनिकमध्ये लिव्हरशी संबंधित आजारावरील औषध उपचार करण्यात येणार आहे.