नाट्यसंमेलनात आयोजकांनी साधला अचूक समतोल, राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 02:35 AM2018-06-05T02:35:01+5:302018-06-05T02:35:01+5:30
९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन १३ जूनपासून मुलुंडमध्ये सुरू होत आहे. बऱ्याच वर्षांनंतर मुंबईत नाट्यसंमेलन होत असल्यामुळे मुंबईकरांमध्येही या संमेलनाविषयी चांगलीच उत्सुकता आहे.
- अजय परचुरे
मुंबई : ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन १३ जूनपासून मुलुंडमध्ये सुरू होत आहे. बऱ्याच वर्षांनंतर मुंबईत नाट्यसंमेलन होत असल्यामुळे मुंबईकरांमध्येही या संमेलनाविषयी चांगलीच उत्सुकता आहे. नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी नुकतेच विराजमान झालेल्या प्रसाद कांबळी यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच होत असलेल्या नाट्यसंमेलनासाठी चांगलीच राजकीय मुत्सद्दी आणि चतुराई दाखवली आहे. १३ जूनला होणा-या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन राज ठाकरे, शरद पवार आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे.
१५ जूनला होणाºया संमेलनाच्या समारोपाला उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आहेत.
स्वागताध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि प्रसाद कांबळी यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत त्यांनाही नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे उद्घाटनाला राज व समारोपाला उद्धव असा अचूक समतोल आयोजकांनी या संमेलनात साधला आहे.
मुंबईतील ताकदवर राजकारणी मंडळीना एकाच ठिकाणी आणण्याचं कसब प्रसाद कांबळींनी शक्य करून दाखविल्यामुळे यजमान नाट्यपरिषदेने अचूक समतोल साधल्याची चर्चा सध्या राजकारणी मंडळीबरोबरच, नाट्यकलाकार मंडळीमध्ये सुरू आहे.
नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकाºयांनी सोमवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. नाट्यसंमेलनाच्या १५ जूनला होणाºया समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरेंनी यावे असे निमंत्रण नाट्यपरिषदेतर्फे प्रसाद कांबळींनी उद्धव ठाकरेंना दिले. उद्धव ठाकरेंनी तत्काळ हे निमंत्रण स्वीकारून समारोप कार्यक्रमाला येण्याचे मान्य करत मुलुंडच्या ९८व्या नाट्यसंमेलनाला शुभेच्छा दिल्या.
प्रसाद कांबळींनी आणि त्यांच्या टीमने सर्व राजकीय धुरंधरांसोबतच निरस नाट्यसंमेलनापासून दूर गेलेल्या सर्व ज्येष्ठ नाट्यकलाकारांनाही एकत्रित नाट्यसंमेलनात येण्याचे कसब करून दाखविल्यामुळे या वेळचे नाट्यसंमेलन वेगळे आणि रोचक होईल अशी चर्चा याआधीच नाट्यवर्तुळात रंगू लागली आहे.