दहिसरच्या सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल शाळा संकुल इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न
By मनोहर कुंभेजकर | Published: June 15, 2023 06:45 PM2023-06-15T18:45:58+5:302023-06-15T18:46:14+5:30
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण आज मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडले.
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर (पश्चिम) येथील सखाराम तरे बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पण आज मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडले. शिशूवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशूवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या मुलांप्रमाणेच आता मराठी आणि इतर माध्यमांच्या मुलांचाही शैक्षणिक पाया पक्का होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
या सोहळ्याला स्थानिक आमदार मनीषा चौधरी, मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार-विभागप्रमुखं प्रकाश सुर्वे, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आदी मान्यवरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, उप आयुक्त (परिमंडळ ७) डॉ. श्रीमती भाग्यश्री कापसे, आर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नयनीश वेंगुर्लेकर, पालिकेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेशकंकाळ, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजू तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आज शाळेचा पहिलाच दिवस आणि आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह शाळेच्या नवीन वास्तूत शिक्षण घेता येणार आहे. यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. त्यांना वह्या मोफत दिल्या असल्या तरीही त्या शाळेत न आणता त्यांचा घरीच अभ्यास करायचा आहे. दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेले एकच पुस्तक आणायचे आहे. याच पुस्तकात धडा संपल्यानंतर वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे धडा समजून घेतल्यानंतर त्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी लिहू शकतात. अशा प्रकारची चार पुस्तके वर्षभरासाठी देण्यात आली आहेत, असे त्यांनी नमूद केले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच रोबोटिक, विज्ञान आणि भाषा विषयासंदर्भातील प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरात ज्या-ज्या ठिकाणी शाळांची गरज असेल त्या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रस्ताव तयार करावा, त्याला मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री केसरकर यांनी दिले. दहिसर परिसरात सातवीपर्यंत असलेल्या शाळा लवकरच आठवी ते दहावीपर्यंत सुरू करण्यात येतील, असे केसरकर यांनी सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
व्यावसायिक शिक्षणासह परकीय भाषादेखील अवगत करा
आज जगातील अनेक देशांमध्ये मातृभाषेतच शिक्षण दिले जाते. ठराविक देश वगळता इतर ठिकाणी इंग्रजी भाषेचा वापर केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी आवर्जून शिकावी. त्यासोबतच इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन, रशियन अशा परकीय भाषांचेही आवश्यक ज्ञान घ्यावे. कारण त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जगभरात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तसेच अभ्यास करत असतानाच गणित, विज्ञान आणि व्यावसायिक शिक्षणावरही भर द्यावा, असे आवाहन मंत्री दिपक केसरकर यांनी विद्यार्थी व पालकांना केले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी भारावले विद्यार्थी
दहिसर येथील मुंबई स्कूलच्या नवीन इमारतीत शाळेच्या पहिल्याच दिवशी बसायला मिळणार असल्याने विद्यार्थी भारावले होते. शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मंत्री केसरकर यांनी शाळेच्या नवीन इमारतीची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.
आमदार मनीषा चौधरी यांनी दहिसर परिसरातील विकासकामांची माहिती देताना दहिसर नदी स्वच्छता व संवर्धनाची माहिती दिली. तसेच महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा देखील त्यांनी आढावा घेतला. माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शाळा इमारतीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.उपशिक्षणाधिकारी संगीता तेरे यांनी प्रास्ताविक केले.