लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : निर्माणाधीन डिलाईल रोड पुलाचे उद्घाटन केले म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर यांच्यासह २० जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेचे दुय्यम अभियंता पुरुषोत्तम इंगळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पुलाचे काम पूर्ण झाले तरी ताे प्रवाशांसाठी खुला हाेत नाही म्हणून गुरुवारी रात्री ९ च्या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे काही नेते व कार्यकर्ते यांनी पुलाच्या सुरुवातीला लावलेले बॅरिकेड्स हटवले व पुलावर अतिक्रमण करत नारळ फोडत पुलाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. नंतर त्या पुलावरून काही वाहनांनी प्रवास देखील केला. मात्र, अशा काम पूर्ण न झालेल्या पुलावरून प्रवास केल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. अवैधरीत्या घुसखोरी करून वैयक्तिक सुरक्षेसंदर्भात बेजबाबदारपणे वागणे आदी कलमांतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...म्हणून आदित्यवर दाखल केला गुन्हा
लोअर परेल उड्डाणपुलाची (डिलाईल रोड पूल) दुसरी मार्गिका अनधिकृतरीत्या खुली केल्याने पालिका प्रशासनाने आमदार आदित्य ठाकरे आणि काही नेत्यांसोबत कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान लोअर परेल येथील पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून काही कामे शिल्लक आहेत. पूल सुरक्षित असल्याची खात्री न करता तो खुला करणे वाहतूकदारांसाठी जीवघेणे ठरू शकते म्हणून पालिकेकडून आदित्य ठाकरे आणि इतर नेते, कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे.
कधी खुला करणार? अतिक्रमण करून दुसरी मार्गिका खुली केल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. पथदिवे, लेन मार्किंग, रंगकाम ही अंतिम कामे लवकरात लवकर पूर्ण करून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशा सूचना पालिका आयुक्तांनी पूल विभागाला दिल्या आहेत.
हा पूल आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात येतो, म्हणून पुलाचे जबरदस्तीने उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत त्यांच्या मतदारसंघात स्वतःचे जनसंपर्क कार्यालयसुद्धा उघडले नाही आणि ते आज जनतेचे कैवारी असल्याचा कांगावा करत आहेत. - आ. डॉ. मनीषा कायंदे, प्रवक्त्या, शिंदे शिवसेना
माझ्या मुंबईकरांसाठी लढताना माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर एक नक्की... माझे आजोबा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा नक्की अभिमान वाटत असेल. - आदित्य ठाकरे