Join us

ओबेराॅय माॅल येथे ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई- गोरेगांव (पूर्व) पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर असलेल्या ओबेरॉय मॉल येथे कोविड प्रतिबंधक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई- गोरेगांव (पूर्व) पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावर असलेल्या ओबेरॉय मॉल येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी ड्राईव्‍ह इन लसीकरण केंद्र साेमवारी सुरू करण्‍यात आले. स्‍थानिक आमदार तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्‍या हस्‍ते या केंद्राचे उद्घाटन करण्‍यात आले.

राज्‍याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तीकर, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक ५१ चे नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर यांच्‍या प्रयत्‍नातून हे ड्राईव्‍ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्‍यात आले आहे. कोविड-१९ विषाणू संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्‍हणून बृहन्मुंबई महानगरपालिका लसीकरण केंद्रांची संख्‍या वाढवत आहे. याचाच एक भाग म्‍हणून ड्राईव्ह इन अर्थात वाहनातून येऊन, वाहनात बसूनच पात्र नागरिकांना लस घेण्‍याची सोय येथे उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून, कोणताही समारंभ आयोजित न करता मोजक्‍याच मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत केंद्राचे लोकार्पण करण्‍यात आले.

........................................................