मुंबईत २ जूनपासून फिनटेक महोत्सव , मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:28 AM2018-05-30T06:28:48+5:302018-05-30T06:28:48+5:30
मुंबईत जागतिक ‘फिनटेक हब’ उभारण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून येत्या २ व ३ जून रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ‘फिनटेक’ महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे
मुंबई : मुंबईत जागतिक ‘फिनटेक हब’ उभारण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून येत्या २ व ३ जून रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ‘फिनटेक’ महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
या परिषदेत फिनटेक क्षेत्रातील स्टार्ट अप, विद्यार्थी आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या अभिनव कल्पना आणि उपाय, फिनटेक क्षेत्रातील बदलत्या संधी याची माहिती मिळणार आहे. तसेच बँक, वित्तीय सेवा संस्था, तंत्रज्ञान कंपन्या, माध्यमे आणि गुंतवणुकदार यांच्यासह प्रत्यक्ष संवाद करण्याची संधी मिळणार आहे. फिनटेक धोरण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या धोरणांतर्गथ कर लाभ, आर्थिक प्रोत्साहन आणि महाराष्ट्रातील फिनटेक स्टार्टअपसाठी होस्टिंग सुविधा आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये स्मार्ट फिनटेक हबसाठी प्रोत्साहनपर चटई क्षेत्रासह इतर सवलतींचा समावेश आहे. या महोत्सवात भारतातील बाजारपेठ या विषयांतर्गत भारतातील फिनटेक क्षेत्रातील संधी आणि आव्हाने, जागतिक बाजारपेठ एक दृष्टीक्षेप आदी विषयांवर चर्चा होणार आहे.