वर्सोव्यातील पहिल्या जेनेरिक मेडिसिन स्टोअर्सचे 11 एप्रिलला उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 11:00 AM2018-04-09T11:00:36+5:302018-04-09T11:03:48+5:30
वर्सोव्यातील नागरिकांना स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर वर्सोव्यात जेनेरिक मेडिसिन्सची चळवळ उभी करणार आहेत.
मनोहर कुंभेजकर
वर्सोव्यातील नागरिकांना स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर वर्सोव्यात जेनेरिक मेडिसिन्सची चळवळ उभी करणार आहेत. देशातील गरजू महिलांना मोफत सॅनेटरी नॅफकीन पॅड उपलब्ध करून देणाऱ्या आणि पॅड वुमन अशी ख्याती असलेल्या आमदार डॉ. लव्हेकर येथे आता जेनेरिक मेडिसिनच्या चळवळीच्या माध्यमातून वर्सोवा यारी रोड येथे चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलच्या समोर जेनेरिक मेडिसिन स्टोर सुरू करणार आहेत.
त्यांच्या या चळवळीमधील पहिल्या जेनेरिक मेडिसिन स्टोअरचा शुभारंभ येत्या 11 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. वर्सोवा,यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार विनायक मेटे भूषवणार असून यावेळी चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलचे प्राचार्य व शिक्षणतज्ञ प्राचार्य अजय कौल,कूपर हॉस्पिटलचे डीन डॉ.आर.एन.शिंदे,किशोर रहेजा,अब्बास भोजानी आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ.लव्हेकर यांनी दिली.
अनेक गरीब व गरजू रूग्णांना महागडी औषधे घेणे पैशांअभावी शक्य होत नाही. त्यामुळे अशा रूग्णांना कमीत कमी खर्चात औषधं उपलब्ध व्हावीत या उद्देशाने त्यांच्या पुढाकारातून येथे जेनेरिक मेडिकल स्टोअर सुरू होत आहे. हे स्टोअर सुरू करण्याच्या संकल्पनेबद्दल आमदार डॉ.लव्हेकर यांनी सांगितले की, " आरोग्य सुविधांसाठी सर्वसामान्यांना पदरमोड करावी लागते. त्यातही डॉक्टरांच्या तपासणी शुल्कापैकी 70-80 टक्के खर्च औषधांवरच होतो. मात्र जेनेरिक औषधे खरेदी करून रूग्णाला मोठा आर्थिक दिलासा देता येतो.सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांकडे कमाईचे कुठलेही साधन नसते आणि त्यांच्यासाठी ही जेनेरिक औषधे वरदान ठरतात. त्यामुळे प्रत्येक रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकाने डॉक्टरांना जेनेरिक औषधे प्रिस्क्राईब करण्याचा आग्रह करावा असे आवाहन त्यांनी केले. वर्सोव्यातील पहिल्या जेनेरिक औषधांचे स्टोअरच जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा. वर्सोव्यात ठिकठिकाणी अशा प्रकारची जेनेरिक औषधांची स्टोअर्सची मालिका सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जेनेरिक औषधे म्हणजे औषधांचे केमिकल नाव नसून त्यात असलेल्या घटक पदार्थाचे नाव आहे. उदाहरणार्थ - क्रोसिन, अँस्प्रिन, डिस्प्रिन ही औषधे ब्रँन्डेड नावाने लिहीली जातात. यात मूळ घटक 'पॅरासिटॉमॉल' असते. डॉक्टरांनी हीच औषधे जेनेरिक नावाने लिहून दिली तर त्याची किंमत 40-70 टक्क्यांनी कमी होते अशी माहिती आमदार डॉ.लव्हेकर यांनी शेवटी दिली.