Join us

‘मुंबई आमची बालमित्रांची’ अभियानाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:07 AM

मुंबई : बाल कामगार, बाल भिक्षेकरी, बालकांचे शोषण व रस्त्यावरील मुले या बालकांच्या समस्यांतून मुक्त करण्याबाबत राष्ट्रीय बाल हक्क ...

मुंबई : बाल कामगार, बाल भिक्षेकरी, बालकांचे शोषण व रस्त्यावरील मुले या बालकांच्या समस्यांतून मुक्त करण्याबाबत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुंबई शहरात अभियान राबवण्याची सूचना केली होती. त्या अंंतर्गत गुरुवारी ‘मुंबई आमची बाल मित्रांची’ या अभियानास मुंबईत सुरुवात झाली.

मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये, असुरक्षित, हरवलेली आणि सापडलेली अशा मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी मुंबई येथे ‘मैत्रीपूर्ण ठिकाणे’ या अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश मुंबई शहराला अशा मुलांसाठी मैत्रीपूर्ण ठिकाण बनविणे आहे, असे निवतकर यांनी सांगितले.

या अभियानात मुंबईतील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, हाजी अली, सिद्धिविनायक मंदिर, सार्वजनिक उद्यान, रेल्वे स्टेशन, रस्ते त्या - त्या विभागामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी अशी मैत्रीपूर्ण ठिकाणे बनविण्यात येतील जेथे त्यांचे आरोग्य, शिक्षण, पौष्टिक आहार, समुपदेशन यांची सर्वांगीण काळजी घेण्यात येईल; तसेच हरविलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा पालकांच्या ताब्यात देऊन पुनर्वसन करण्यात येईल. अशा प्रकारे बालकांच्या सर्व हक्कांचे संवर्धन करण्याचे प्रयोजन आहे, असे निवतकर यांनी स्पष्ट केले.

या अभियानाअंतर्गत पुढील सहा महिन्यांत सोशल मीडियाद्वारे जागरूकता निर्माण करणे, आरोग्य शिबिर घेणे, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे येथे बचावकार्य राबविणे, सामान्य लोकांच्या माहितीसाठी बूथ उभारणे, कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांसह बाल कल्याण समिती, पोलीस, वॉर्ड समित्या, नगरसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण घेणे यांचा समावेश आहे.

मुंबईमध्ये अशा प्रकारच्या मुलांसोबत काम करणाऱ्या सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या कामामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई शहर, समाज सेवा शाखा, मुंबई पोलीस, बाल आशा ट्रस्ट, आय.जी.एम. प्रेरणा, विधायक भारती, प्रथम, चाइल्ड लाइन इ. स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. ही मोहीम मुंबई शहराच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रेमा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे.